सामाजिक

आंबेडकरी चळवळ आणि विचार तळागाळात पोहचवा


बांबवडे : अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या दलदलीत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी, त्याचप्रमाणे अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या समाजाची आर्थिक उन्नती करण्यासाठी , सवलतींचा पूल विश्वरत्न डॉ.. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला. परंतु आज सुमारे ६५ वर्षांनंतर सुद्धा खऱ्या अर्थाने या समाजातील माणूस, आर्थिकदृष्ट्या उन्नत झाला आहे का ? या गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचे आहे. तसेच या मागची कारणे सुद्धा शोधून काढून त्यावर परिणामकारक उपाय करणे , हि काळाची गरज आहे. तरच आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि चळवळींना खांद्यावर घेण्यास योग्य ठरू शकतो. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ वा महापरिनिर्वाण दिन आहे. या अनुषंगाने त्या महामानवाला साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज आणि परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन.
आज शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा, या आदेशाचे पालन बऱ्याच अंशी झाले .परंतु हे होत असताना जि मंडळी शिकली, जि मंडळी संघटीत झाली,आणि ज्यांनी संघर्षासाठी वसा उचलला . त्यांनी फक्त काही मर्यादित मंडळीं पुरताच त्याचा फायदा करून घेतला, हे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. एका हरिजन समाजामध्ये घरटी नेता उभा राहिला, मी अमुक गटाचा,मी तमुक गटाचा , मी संघाचा, मी त्या महासभेचा अशा गोष्टीत प्रत्येकाची विभागणी झाली. आणि खऱ्या अर्थाने त्या समाजाला या चळवळीची अक्षरशः गरज होती . तो समाज मात्र आजही अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडला आहे.
जो शिकून पुढे गेला, आर्थिक दृष्ट्या उन्नत झाला. त्याने मागे गावाकडे पाहिलेच नाही. काही मंडळी मात्र या गोष्टीला अपवाद आहेत. परंतु सर्वाधिक माणसं या सवलतींच्या पुलावरून जाऊन पलीकडे गेलीत, आणि उरलेला समाज मात्र आजही गावकुसाबाहेरच आहे. आजही शासनाने दिलेल्या १५% योजनेचा त्या मागासवर्गीय समाजासाठी खऱ्या अर्थाने वापर होतो का? हा प्रश्न सुद्धा सर्वार्थाने विचार करावयास लावणार आहे. आम्ही निव्वळ बाबासाहेबांचं नाव घेऊन आंदोलने केलीत. इकडच्या तिकडच्या चीरीमिरीत अडकून फक्त स्वतःचीच पोटे भरली. पण खेड्याकडे पाहिलं तर आजही हरिजन समाजातील माणूस दारिद्र्यात खितपत पडलेला दिसत आहे. जर खऱ्या अर्थाने आम्हाला आंबेडकरी विचारांचा आदर करावयाचा असेल , त्यांनी चालविलेला संगर पुढे न्यावयाचा, तर जी जी मंडळी मोठी झालीत, त्यांनी आपल्या गावाकडे निश्चित वळून पाहावे. तिथे आपला बांधव , मायभगिनी तुमच्या मदतीची अपेक्षा करीत आहेत. आजही कोणीतरी विद्यार्थी शिक्षणासाठी आर्थिक दृष्ट्या मागे पडला असेल, तसेच आजही एखादे बाबासाहेब मिणमिणत्या चीमानिखाली अभ्यास करीत असतील. तर अशा मंडळींना सहकार्य करण्याची नितांत आवशकता आहे. निव्वळ एक बाबासाहेब आंबेडकर निर्माण व्हायला पाहिजे. अशा पद्धती ची चळवळ, विचार या समाजात रुजवले गेले पाहिजेत. फक्त संघ , सभा , गट-तट यांचा विचार करून चालणार नाही, तर आपल्या प्रत्येकामध्ये नवीन बाबासाहेब आंबेडकर निर्माण व्हायला पाहिजेत. अशा पद्धतीची चळवळ, विचार या समाजात रुजवले गेले पाहिजेत. फक्त संघ, सभा, गट-तट यांचा विचार करून चालणार नाही, तर सगळ्या समाजाला पुढे नेणारा तुमच्या आमच्यामध्ये एक नवीन बाबासाहेब निर्माण झाले पाहिजेत. तरच त्यांचे विचार वाचले आणि जगलो ,असे होईल. निव्वळ आरक्षणातून जागा बळकावून स्वत: पुरतं घरटं सजवण्यात अर्थ नाही, तर गावात राहणाऱ्या आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या दलित समाजाला पोट भरण्यासाठी काही उद्योग निर्माण करावे लागतील. अन्यथा त्यावेळची गुलामगिरी हि शारीरिक म्हणता येईल. आणि सध्याची गुलामगिरी हि मानसिक ठरवली जाईल. हे लिहिण्यामागे कुणाचा अपमान करणे, हा उद्देश अजिबात नाही. तर समाजात सुरु असलेली वस्तुस्थिती मांडून समाजाला एक उन्नत अवस्था प्राप्त व्हावी, हीच सदिच्छा आहे. आणि असे झाले, तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आणि त्यांच्या विचारांना अभिवादन ठरेल. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन ..

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!