Uncategorized

शाहुवाडी त आज ” काटे की टक्कर ” : जिल्हा बँकेसाठी आज मतदान होतेय

बांबवडे : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आज मतदान होत आहे. शाहुवाडी तालुक्यात आज ‘ काटे की टक्कर ‘ होणार असून, अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याचे शाहुवाडी तालुक्याकडे लक्ष लागले आहे.


तालुक्यातून विद्यमान संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर विरुद्ध रणवीरसिंग मानसिंगराव गायकवाड अशी लढत होत आहे. सेवा संस्था गटातून हे दोन्ही उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत. दरम्यान मागील निवडणुकीत मानसिंगराव गायकवाड हे उमेदवार म्हणून सेवा संस्था गटातून उमेदवारी लढवीत असताना , गनिमी कावा करून सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी त्यांच्या हातातील विजय हिसकावून नेला होता. तेंव्हापासून या दोघांमधून विस्तव जात नाही. यंदाच्या निवडणुकीत मानसिंगराव गायकवाड यांनी आपले चिरंजीव रणवीरसिंग गायकवाड यांना या निवडणूक रिंगणात उतरवले आहे.


या निवडणुकीत हे दोन्ही उमेदवार एकाच राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी पॅनेल मधून निवडणूक लढवीत आहेत. यामध्ये मानसिंगराव गायकवाड यांच्याकडे ठराव सर्वाधिक आहेत. परंतु मागील निवडणुकीत सुद्धा अशीच परिस्थिती होती, तरीदेखील सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी त्यांच्या हातातून विजय हिसकावून नेला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत गायकवाड पितापुत्र सावध आहेत. त्यांनी आपले ठराव धारक जपून ठेवले आहेत. या उलट सर्जेराव पाटील पेरीडकर हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने निवडणूक लढवीत आहेत. यांच्याकडे वरवर पाहता सेवा संस्थांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. परंतु मागील निवडणुकीत त्यांनी साधलेला गनिमीकावा पाहता गायकवाड मंडळी अधिक सावध आहेत.


आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेत नेमके कोण सरस ठरतंय ,याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून, जनतेचे डोळे ७ जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणी कडे लागले आहेत. त्यामुळे या काटे की टक्कर मध्ये विजयश्री कोणाला माळ घालते याची उत्सुकता सामान्य जनतेला लागली आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!