पत्रकाराने सामान्य माणसाचा आवाज बनावे – श्री संजय आवटे संपादक,दिव्य मराठी
बांबवडे : सध्याची पत्रकारिता हि ग्रामीण पत्रकारितेच्या अधिष्ठानावर उभी आहे. कारण ग्रामीण पत्रकाराला आपली पत्रकारिता करण्यासाठी बरेच काही करावे लागते. यासाठी त्यांचं सर्वस्व पणाला लागलेलं असतं. पत्रकारिता हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे, आणि आजही तो जिवंत आहे, हे या पत्रकारांच्या माध्यमातून सिद्ध होतंय. असे मत दै.दिव्य मराठी चे माराष्ट्र चे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले.

वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा महाविद्यालय इथं पत्रकार दिनाच्या अनुषंगाने प्रती वर्षी पत्रकारांचा सन्मान केला जातो. त्याच अनुषंगाने पत्रकार दिनाचा सोहळा संपन्न झाला. हा प्रवास गेली २१ वर्षांपासून संपन्न होत आला आहे. यावेळी अध्यक्ष स्थानावर शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार या उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय आवटे उपस्थित होते. तसेच इस्लामपूर येथील पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे हे देखील उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील काका उपस्थित होते. यावेळी पत्रकारांचा डायरी, सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी , ‘ अनाथांची माय सिंधुताई सपकाळ ‘ यांना महाविद्यालय आणि उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रताप पाटील उर्फ काका यांनी केले.

या कार्यक्रम प्रसंगी संपादक संजय आवटे पुढे म्हणाले कि, सध्याची परिस्थिती पाहता वर्तमानपत्र कालबाह्य होतंय कि, काय अशी परिस्थिती असताना, वर्तमानपत्र आजही जिवंत आहे, ते फक्त ग्रामीण पत्रकारितेच्या जीवावर आहे. कारण काहीहि सुविधा उपलब्ध नसतानाही हा वर्ग काम करीत राहिला आहे. कारण माणसाच्या जगण्याचं कुतूहल ग्रामीण पत्रकाराला आहे. असेही श्री आवटे म्हणाले. यापुढे जावून ते म्हणाले कि, पत्रकाराने कधीही व्यवस्थेचे पार्टनर बनू नये. त्यांनी सामान्य माणसाचा आवाज बनून राहिलं पाहिजे.असाही मोलाचा सल्ला श्री आवटे यांनी दिला. जाता जाता ते म्हणाले कि, वर्तमानपत्राने भविष्यपत्र बनण्याची आता गरज होवू लागली आहे,अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

श्री संजय आवटे यांनी सुमारे ४५ मिनिटे आपल्या भाषणातून पत्रकारिता मांडण्याचा थोड्या काळात मोठा यशस्वी प्रयत्न केला आहे.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.निशा मुडे-पवार म्हणाल्या कि, जात धर्म आणि प्रदेश याच्याही पुढे जावून पत्रकारिता जपली पाहिजे.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत. दरम्यान महाविद्यालयाच्या वतीने उपस्थितांचा योग्य सन्मान करण्यात आला.
यावेळी सूत्र संचालन सौ.सुवर्णा आवटे यांनी केले तर आभार डॉ. प्रदीप कांबळे यांनी मानले.