राजकीयसामाजिक

सह्याद्रीच्या छाताडातून उसळी घ्यावी रक्ताने, इतिहासाच्या पानांनीही दखल घ्यावी जातीने, असाच आमचा नेता होता, फडकवी पताका विश्वासाने, ” दादा ” याल का हो परतून पुन्हा वाट पाहतोय आपुलकीने ….

सह्याद्रीच्या शिरपेचातील एक मुकुटमणी गळून पडला, आणि अवघ्या सह्याद्रीच्या हृदयातील काळीज बाहेर पडले, असं खुद्द सह्याद्रीला वाटलं. शाहुवाडी पन्हाळा तालुक्यातील कडवी, वारणा, शाळी, कुंभी, कासारी या नद्या एकेकाळी अश्रू बनून वाहू लागल्या. आज , मात्र हेच अश्रू,  आहे तिथेच दगड बनून राहिले आहेत. कारण त्यांच्यावर प्रेम करणारं नेतृत्व अजूनही या निसर्गाला सापडलेलं नाही. कारण त्यांनी आणलेली भगीरथाची गंगा आजही केवळ सात लघुपाटबंधारे तलावांवरच थांबली आहे. आजही सामान्य जनता महागाई आणि विकासाची वाट पहात आहे. वाड्या वस्त्यांवर एसटी पोहचावी, म्हणून तुम्ही केलेले रस्ते, आजही त्या एसटी ची वाट पहात आहेत. परंतु अजूनही प्रत्येक गावात एसटी पोहोचलेली नाही. अशी अनेक दु:खे आजही तुमच्या खुळ्या-कावऱ्या जनतेला तेवढ्याच वेदना देत आहेत, ज्या शमवण्यासाठी, तुम्ही तुमचे आयष्य खर्ची घातले. रात्रंदिवस तुम्ही केलेले कष्ट आजही अपूर्ण वाटू लागले. कारण सर्वसामान्य जनतेचा खिसा फाटकाच राहिला आहे. त्यांच्या खिशात चार पैसे खुळखुळावे  या अनुषंगाने तुम्ही त्यांच्या उशाला पाण्याची गंगा आणून सोडली, पण त्यावर पाणीपुरवठा योजना अजूनही राबवल्या गेलेल्या नाहीत. अशी अनेक दु:खे तुमच्या पश्चात तुमच्या खुळ्या-कावऱ्या जनतेला भोगावी लागत आहेत.


हि होती स्वप्नांची गाथा, जी स्व. आमदार संजयसिंह  गायकवाड दादा यांनी आपल्या जनतेसाठी पाहिली होती. जनतेच्या दुर्दैवाने एक अवलिया आपल्या सामान्य जनतेचे  घर बांधता बांधता अर्ध्यात निघून गेले. आज त्या घटनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. अशा महान नेतृत्वाला ,साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स आणि एसपीएस न्यूज च्या वतीने मानाचा मुजरा. तुटलेल्या मनाच्या ओंजळभर अश्रूंची ही  शब्द्सुमानांजली.


आज हे सर्व लिहू शकलो, कारण हे आम्ही स्वत: अनुभवलेलं आहे. या व्यक्तिमत्वाने स्वत:च्या संसारापेक्षा सामान्य जनतेचा संसार कसा सावरला जाईल, याकडेच आयुष्यभर लक्ष दिले. म्हणून एकेकाळी त्यांचं सारथ्य केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कर्णसिंह गायकवाड आणि तुमाचे आमचे बाळ दादा, यांच्या आयुष्याला वेग देणं राहून गेलं. विद्यमान आमदार विनय कोरे यांनी केलेल्या सहकार्यामुळे , आणि त्यांचीही ती मनिषा असल्यामुळे गोकुळ चे संचालक पद मिळाले आहे. त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सार्वांचेच मनापासून आभार. कारण त्यांच्या वडिलांनी आपल्यासाठी जे केलं, त्यांच्या सुपुत्रासाठी काही तरी करण्याची संधी मिळाली, हेही नसे थोडके.


दादांनी स्वत:च्या कुटुंबाकडे कधी लक्ष दिले नाही. स्वत:च्या संसाराकडे लक्ष दिले नाही. कारण त्यांना तेवढा आत्मविश्वास होता , कि माझ्या पश्चात माझी जनता माझ्या आप्तेष्टांना कधी वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणूनच मिळत असलेल्या मंत्रीपदावर पाणी सोडून, माझ्या जनतेसाठी पाणी द्या,असा आग्रह धरून सह्याद्रीच्या कुशीतून बाहेर पडणाऱ्या नद्यांना अडविण्यात त्यांना यश मिळालं, आणि तालुक्यात सात लघुपाटबंधारे तलाव निर्माण झाले. आपला तालुका निसर्ग संपन्न आहे. परंतु केवळ पावसाळ्यातच. एकदा का पावसाळा संपला कि, जनता हवालदिल व्हायची. .आणि सुरु व्हायची पाण्यासाठी भटकंती. एवढा मोठा सह्याद्री जो पावसाळ्यात भरभरून व्हायचा, तो ही पावसाळा संपला कि, आकाशाकडे डोळे लावून, पाण्यासाठी वाट बघत बसायचा. यासाठी शासकीय दरबारी दादांनी महत्प्रयास करून, लघुपाटबंधारे निर्माण केले. सुमारे अडीच ते साडेतीन टीएमसी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या तलावांमध्ये आहे. यामुळे यांच्या भिजक्षेत्रात असलेला शेतकरी सुखावला. दोन पैसे त्याच्या खिशात खुळखुळू लागले.


केवळ यावर शाहुवाडी पन्हाळा तालुक्यातील समस्या संपल्या,असे नाही. कारण त्यावेळी वाडी-वस्तीवर जाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. वाडीवर एखादा वृद्ध माणूस आजारी पडला कि, त्याला पाठकुळीवर मारून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागत होते. एखादी महिला प्रसूतीसाठी आणायची असेल, तर तिला घोंगड्याची खोळ करून त्यात घालून आणावे लागत होते. अशी परिस्थिती वाड्या-वस्त्यांवर होती. यासाठी दादांनी प्रत्येक वाडी-वस्तीवर रस्ता नेण्याचा चंग बांधला, आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झाले. परंतु यासाठी ते कितीवेळा चालत या वाड्यांवर गेले हे ईश्वरंच जाणो.


शिक्षण हे वाघीणीचं दुध असतं, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. म्हणून माझ्या जनतेची नवी पिढी शिकावी, ज्ञानाने समृद्ध व्हावी, यासाठी शक्य तिथे वाडीवर शाळा सुरु केल्या. कारण नोकरीधंद्यासाठी बाहेर पडणारी माझ्या मतदारसंघातील पिढी अडाणी राहू नये. किमान मुलभूत शिक्षण तरी त्यांना मिळावं, हा त्यामागील हेतू होता.


तसेच अनेक पिढ्या चिमणीच्या दिव्यात अंधारात खितपत पडलेल्या या महान नेतृत्वाने पाहिल्या होत्या. माझ्या शेतकऱ्याच्या घरात विज्ञानाचा दिवा लागावा, म्हणून अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाठराखण केली, आणि त्यावेळी बहुतांश वाड्यांवर वीज पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अनेकवेळा किरकोळ आजार अंगावर काढावे लागत होते. कारण पैशाची टंचाई आणि आरोग्ययंत्रनांपर्यंत पोहोचणे शक्य व्हायचं नाही. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत होते. हे सुद्धा थांबलं पाहिजे, म्हणून दादांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यासाठी, तसेच वाड्यावरील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणांना धारेवर धरलं. अशा अनेक घटना आहेत, ज्या दादांनी आपल्या जनतेसाठी केल्या.
या समाजविकासाच्या नादात दादांनी आपल्या तब्येतीची हेळसांड केली. आणि त्याचेच परिणाम आगंतुकपणे आमच्यासारख्यांना पाहायला लागले. अशाच एका बेसावध क्षणी सर्वांना तारून  नेणारा , हा आमचा देवदूत आमच्यामधून कसा निघून गेला, कधी निघून गेला, हे कळलेच नाही. दादा गेले आणि अवघ्या मतदारसंघाने हंबरडा फोडला. सह्याद्रीच्या अश्रूंचा प्रलय आला, आणि इथली जनता पोरकी झाली.


दादा जेंव्हा निवर्तले, तेंव्हा त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुमारे सात ते आठ मंत्री उपस्थित होते, रक्षाविसर्जनासाठी राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते. हे सर्व पहात असताना, जाणीव झाली कि, एकीकडे जनतेची काळजी घेत असताना, या माणसाने दुसरीकडे मंत्र्यांची फौज उभी केली होती. कारण माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे. म्हणून एवढे मंत्री त्या सलगीतून उभे राहिले. दादा केवळ एक आमदार होते. तरीही  एवढी गर्दी उभ्या आयुष्यात आम्ही कधी पाहिली नव्हती.
हे सगळं खरं असलं,तरीही यातून जि हांनी झाली, ती फक्त तुमच्या आमच्या सामान्य जनतेची झाली.  दादांच्या कुटुंबाची झाली. ज्यांनी अनेकांची कुटुंबे उभी केली, परंतु त्यांचं कुटुंब मात्र या दगदगीत अनेक वर्षे मागे गेलं. कारण कर्णसिंह यांचं वय लहान असल्याने, त्यांना आमदार होता आलं नाही. वाहिनिसाहेबांनी काही काळ गड सांभाळला. त्यातून त्यांनी वीज वितरण केंद्र तालुक्यात आणलं. त्यांच्याच काळात निर्माण झालेलं बांबवडे येथील क्रीडा संकुल आजही अर्धवट अवस्थेत आहे. सरूड रस्त्यावर पावसाळ्यात नेहमीच पाणी यायचं, म्हणून त्या ठिकाणी वैधानिक विकास मंडळाच्यावतीने रस्त्याची उंची वाढवून घेतली. अशी अनेक कामे वहिनीसाहेबांच्या काळात झाली. पण त्यानंतर मात्र विकासाला खिळ बसली. विकास झाला, पण पूर्णत्वास गेला नाही. अजूनही अनेक गावात एसटी पोहोचलेली नाही.  अजूनही शेतकऱ्यांना शेताच्या पाण्यासाठी योजना झालेली नाही. शेतकऱ्याच्या उशाला नेवून ठेवलेलं पाणी आजही त्याच्या शेतात जाण्याची तजवीज केली नाही. त्या लघुपाटबंधारे तलावांवर योजना राबवल्या असत्या, तर अजूनही शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली आली असती. असो.
असे हे व्यक्तिमत्व नव्या पिढीने पाहिले नाही, पण त्यांच्या कर्तुत्वाचा लेखा जोखा या ओंजळीतून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कारण त्यांनी जमविलेलं कार्यकर्त्यांचं मोहोळ, आज हि आपल्या संजयदादांची आठवण काढत आहे. आजही त्यांच्या डोळ्यांच्या कडा आपल्या नेत्याच्या स्मरणातून ओल्या झाल्या नाहीत, तरच नवंल. असे हे व्यक्तिमत्व आपल्याला सोडून जावून २० वर्षे झालीत, तरीही सामान्य जनतेच्या हृदयातील एक कप्पा एका हळुवार क्षणी काही अश्रुंचे थेंब गाळंत आहे, पण एकांतात. अशा या महान विभूतींना पुनश्च भावपूर्ण आदरांजली.
पहा नभानो ,पहा ताऱ्यांनो अवघा सह्याद्री पुन्हा रडला,
आज आठवणींच्या हुंदक्यातूनहि  आमचा ” दादा ” पुन्हा अवतरला…
स्व. संजयदादांना पुनश्च भावपूर्ण श्रद्धांजली आणि तमाम संजयदादा प्रेमी जनतेकडून हा मानाचा मुजरा.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!