” ‘ वर्षा ‘ ते ‘ मातोश्री ‘ “आलेली भगवी त्सुनामी


बांबवडे : आज शिवसेना सुन्न झाली आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेत राजकीय भूकंप होतो, त्या त्या वेळी शिवसेनेच्या सागराला भरती येते. काल दि. २२ जून रोजी ” वर्षा ते मातोश्री ” पर्यंत शिवसैनिकांची अशीच भगवी त्सुनामी आलेल्याचं पहायला मिळालं. शिवसैनिकांची, शिवसेनेवर असलेली अपार श्रद्धा आणि निष्ठा या घटनेने अधोरेखित झाली.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादानंतर आपण जे बोललो, ते खरे करून दाखवलं. त्यांनी रात्रीतच वर्षा निवासस्थान हलवलं. आणि पुन्हा एकदा आपल्या ” मातोश्री ” च्या उबदार घरट्याकडे प्रस्थान केलं. यावेळी वाटेत असलेले शिवसैनिक आपल्या सोबतीची साक्ष घालत होते.


सध्या महाराष्ट्रात आलेला राजकीय भूकंप म्हणजे ” घर का भेदी लंका ढाय “. शिवसेना गेली अनेक वर्षे सत्तेशिवाय होती. त्यावेळी सुद्धा शिवसैनिक घरचं खावून सेनेचं काम करायचा, आज सत्ता आल्यानंतर सुद्धा वयैक्तिक आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. आणि मुख्य म्हणजे त्याची त्याला तमा नाही. कारण शिवसेना म्हणजे ८० % समाजकारण आणि २० % राजकारण हे समीकरण आहे. तो त्यावेळी सुद्धा तसाच होता, आणि आत्ता सुद्धा तसाच आहे. त्यामुळे जि मंडळी गुवाहाटी त गेली आहेत, आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होतंय, असं सांगत आहेत, हे म्हणजे ” ताकाला जावून मोगा दडवायचा ” असा प्रकार आहे. दुसरा मुद्दा हिंदुत्व . शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, म्हणजे नक्की काय केले ? हा प्रश्न सुद्धा अनुत्तरीतच आहे.


एकंदरीत ज्यांना सत्ता हवी आहे, त्यांच्याशी होवू घातलेली हि खरी अनैतिक युती आहे. शिंदे साहेब म्हणतात मविआ शी नातं म्हणजे अनैसर्गिक युती. हे तुम्हाला सत्ता स्थापन करताना कळलं नव्हतं का ? त्यावेळी त्याला विरोध का नाही केला ? असे अनेक प्रश्न आहेत,ज्याची उत्तरे शिंदे साहेब देवू शकणार नाहीत. दरम्यान त्यांना मुख्यमंत्री पद हवं असेल, तर त्यांनी आपल्या घरात मागावं, शेजाऱ्याला सांगून काही मिळत नसतं. कारण देणारा हा आपलाच बाप असतो, शेजारी नाही.


असो. कोणी राहिलं, आणि कोणी गेलं, यामुळे मुळच्या पायाला कधी धक्का बसत नाही. कारण असे राजकीय भूकंप पचवूनच शिवसेना मोठी झाली आहे. एकूण ५५ आमदार गेले, तरीही चालतील, शिवसेनेला त्याचा फरक पडणार नाही. कारण शिवसेनेचा आत्मा हा शिवसैनिक आहे. आणि तो आपली जागा सोडत नाही. हे मात्र कालच्या एकंदरीत परिस्थितीवरून दिसून आलं.


एकेकाळी शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता, तेंव्हा सुद्धा शिवसेना गडबडली नाही. कारण शिवसैनिक साहेबांसोबत होता. आजही एक एक करून आमदार जात आहेत. एकंदरीत काय ज्यांना जायचं आहे, त्यांनी एकदम जावं, त्याचा त्रास होणार नाही. जोपर्यंत शिवसैनिक सेनेत आहे, तोपर्यंत शिवसेना भक्कम राहील. जहाजाला भोक पडल्यावर पहिले कोण पळतात, ते सगळ्यांनाच माहित आहे. आणि दुसरे म्हणजे काही मंडळी वल्गना करतात, कि, आम्ही म्हणजेच शिवसेना. त्यांनी हे दिवास्वप्न पहण्याचं बंद करावं. कारण बैलगाडी चालत असताना, काहींना असं वाटतं ,कि, मीच बैलगाडी चालवतोय. ते तसं नसतं, बैलगाडी बैल ओढत असतात, आणि चालवणारा त्या बैलांचा मालक असतो. तेंव्हा तसल्या भ्रमात कोण असेल ,तर ते चुकीचं आहे.


असो. ” साहेब ” हा एकाच शब्द शिवसैनिकांसाठी पुरेसा आहे. सत्तेच्या लालसेपोटी दुसऱ्यांची घरे जळणाऱ्या पैकी शिवसेना नाही. हा जो शब्दप्रपंच आहे, तो आमचा वयैक्तिक मानस आहे, तोच आम्ही मांडला आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!