भैरेवाडी ग्रामस्थ फसवणुकी पासून थोडक्यात बचावले…
बांबवडे : भैरेवाडी तालुका शाहुवाडी इथं हेल्थ कार्ड च्या नावाने ग्रामस्थांना गंडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे ग्रामस्थ बचावले.

याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, भैरेवाडी इथं काही जणांकडून आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये ग्रामस्थांना हेल्थ कार्ड घेण्याचा आग्रह धरण्यात आला. ज्यांच्याकडे हे हेल्थ कार्ड असेल, त्यांना काही आजार झाल्यास ठराविक हॉस्पिटल मध्ये बिलामध्ये सवलत दिली जाईल, असे आमिष दाखविण्यात आले. प्रति हेल्थ कार्ड २५०/- रु. आकारले गेले होते.

गावातील नागरिकांच्या सजगतेमुळे काही जणांनी तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, अशा प्रकारचे शिबीर घेणे अवैध आहे, असे डॉ. एच.आर. निरंकारी यांनी सांगितले. तसेच आपले एक आरोग्यसेवक घटनास्थळी पाठविले. त्यानंतर संबंधित मंडळी गडबडली, आणि त्यांनी प्रत्येक ग्रामस्थांचे ज्यांनी कार्ड घेतले होते,त्यांना त्यांची रक्कम परत केली. व संदर्भीय मंडळींना शाहुवाडी पोलीस ठाणे इथं नेण्यात आले.

दरम्यान अधिक चौकशी केली असता, असा प्रकार खुटाळवाडी, सावर्डे इथं सुद्धा घडला असल्याचे समजते. परंतु या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला जात नाही.