बांबवडे ग्रामपंचायत वर कोणाचा झेंडा ?
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या बांबवडे ग्रामपंचायत च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्या अनुषंगाने बांबवडे गावात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. आणि त्यामुळे निवडणुकीचं बिगुल वाजल्याचं निदर्शनास येत आहे.
बांबवडे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे. इथं दोन्ही गायकवाड गटाचे प्रामुख्याने वर्चस्व आहे. त्यानंतर माजी आमदार सत्यजित पाटील,तसेच जनसुराज्य पक्षाचे संस्थापक व विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे गट यांचेदेखील अस्तित्व नाकारता येणार नाही. त्यामुळे किमान दोन गटाची युती जिथं होईल, त्यांच्या गटाची सत्ता प्रामुख्याने अपेक्षित आहे. हे जरी खरे असले, तरी उर्वरित मंडळी जर एकत्र पद्धतीने लढली, तर त्यांच्या विजयाची शक्यता देखील नाकारता येणार नाही.
पारंपारिक पद्धतीने बांबवडे गावात जुने बांबवडे व नवे बांबवडे हा विषय होता. परंतु सध्या तशी परिस्थिती नसून, संपूर्ण बांबवडे मिळून निवडणूक रणशिंग फुंकले गेले आहे. यामध्ये किमान दोन पॅनेल अपेक्षित आहेत. याचबरोबर यंदा अपक्षांची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. मागील सत्ताधाऱ्यांमध्ये कर्णसिंह गायकवाड गट व मानसिंगराव गायकवाड गट सत्तेत होते. तसेच सरपंच पद थेट जनतेतून असतानाही, कर्णसिंह गटाचे सरपंच सागर कांबळे विजयी झाले होते.
यंदाच्या निवडणुकीत मानसिंगराव गायकवाड गट व माजी आमदार सत्यजित पाटील गट एकत्रित येण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान च्या काळात दोन गायकवाड एकत्र येणार का ? हा प्रश्न सुद्धा अद्याप अनुतार्रीत आहे. यावेळी कर्णसिंह गट व आमदार डॉ. कोरेंचे समर्थक असलेले घोडे पाटील गट यांच्याशी युती करणार का ? हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्वाचा आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तटस्थ राहिलेले जुने आक्रमक शिवसैनिक पांडुरंग वग्रे आबा हे सुद्धा यंदाच्या निवडणुकीत आपला भगवा घेवून उतरत आहेत. यामुळे याचा फटका नक्की कोणाला बसणार ? हा नवीन प्रश्न उद्भवला आहे. कारण पांडुरंग वग्रे हे चळवळीतील तरुण नेतृत्व आहे. समाजाच्या अनेक विकास कामांसाठी रस्त्यावर उतरणारे नेतृत्व असून, याची दखल या निवडणुकीत उतरणाऱ्या प्रत्येक पॅनेल ला घ्यावीच लागणार आहे.
तसेच सलग पाच वेळा निवडून येणारे माजी उपसरपंच सुरेश नारकर यांनादेखील याठिकाणी दुर्लक्षित करता येणार नाही. कारण सलग तीस वर्षे बांबवडे सारख्या संवेदनशील गावात निवडून येणे हे तितके सोपे नाही. याचाच अर्थ त्यांच्या केलेल्या विकासकामांचा हा प्रभाव आहे , हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्याचबरोबर ते आमदार डॉ. विनय कोरे यांचेदेखील समर्थक आहेत. त्यातही यंदाचे सरपंच पद हे इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असून, सरपंच पदासाठी त्यांची उमेदवारी आल्यास आश्चर्य वाटू नये.
दरम्यान कर्णसिंह गायकवाड गटात पहिल्या सारखी बांबवडे मध्ये एकी न राहिल्याने प्रत्येकाने आपले मार्ग स्वतंत्रपणे निवडले आहेत. असे समजते. त्यामुळे बांबवडे ग्रामपंचायत एकहाती कोणाला च जिंकता येईल अशा भ्रमात कोणीही राहू नये. कारण गतवेळची बांबवडे ग्रामपंचायत निवडणूक आणि यंदाची निवडणूक यामध्ये खूप फेरबदल झालेले आपल्याला पहायला मिळणार आहेत. यामुळे बांबवडे ग्रामपंचायत निवडणूक हा एक प्रतिष्ठेचा आणि संघटीत राहण्याचा एक मोठा पर्याय यंदा आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे.