बांबवडे च्या राजकीय पटलावर महायुती आघाडीवर ?
बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे ग्रामपंचायत चे राजकीय वातावरण तापू लागले आहे. पाहता, पाहता तीन पॅनेल बांबवडे गावाच्या राजकीय आखाड्यात तयार झाले आहेत. तर नाराज मंडळींचा अपक्ष गट देखील तयार होवू लागला आहे. यामध्ये अवचित नगर मधील विजय लाटकर यांचा प्रामुख्याने सहभाग दिसत आहे. याचबरोबर त्यांची घरातील महिला सरपंच पदासाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ” पक्ष तर पक्ष,नाहीतर, अपक्ष ” अशी बांबवडे च्या राजकीय वातावरणाची परिस्थिती होवू लागली आहे.

सद्यस्थितीत मानसिंगराव गायकवाड गट, माजी आमदार सत्यजित पाटील गट यांची मागील युती कायम रहात आहे. यामुळे दोन्ही गायकवाड गटाच्या युतीला जवळजवळ पूर्णविराम मिळत असल्याचे चित्र आहे. यामुळे बांबवडे तील नवा चेहरा असलेले भगतसिंग चौगुले हे सरपंच पदाचे उमेदवार आपल्या भेटीगाठींवर भर देताना दिसत आहेत. दरम्यान गावातील परिवर्तन पॅनेल चे प्रमुख व सरपंच पदाचे उमेदवार पांडुरंग वग्रे उर्फ आबा , यांनीसुद्धा जनसंपर्क सुरु केला आहे.

यावेळी कर्णसिंह गायकवाड गटाचे समर्थक विष्णू यादव , सयाजी निकम यांच्या मात्र पडद्यामागे सावध हालचाली सुरु झाल्या आहेत. अद्याप जागा जरी निश्चित झाल्या नसल्या, तरी प्रत्येकजण राजकारणाच्या प्रवाहात ओढला जात आहे. प्रभाग क्र. २ च्या विभागात सर्वाधिक चढाओढ आहे.

याचबरोबर स्व. अशोकराव घोडे-पाटील यांचे चिरंजीव स्वप्नील घोडे-पाटील यांचा गट अद्याप कोणाच्याही गटात जोडले न गेल्याचे समजते. परंतु भावी काळात चौगुले यांच्या युतीमध्ये घोडे-पाटील गट सामील होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे एकंदरीत थेट लढत कर्णसिंह गट विरुद्ध मानसिंगराव गायकवाड गट अशी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्या अनुषंगाने राजकीय कार्यवाही सुरु झाली असल्याचे समजते.

भविष्यात कोण आघाडीवर जाणार या प्रश्नाचे उत्तर जरी गुलदस्त्यात असले, तरी सद्यस्थितीत महायुती आघाडीवर आहे असे दिसते.