अरे, कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र आमचा ?…
कर्नाटक चे मुख्यमंत्री सांगली नंतर सोलापूर कडे वळले. सांगली येथील जत तालुक्यातील ४० गावानंतर या महाशयांनी चक्क सोलापुरातील जनतेला आवाहन केले आहे. अशावेळी महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ नेमकं काय करतंय ? स्वाभिमानाची आणि बाळासाहेबांच्या विचारांची भाषा करणारे मुग गिळून गप्प का बसले आहेत ? कि, आत्ता राज्याच्या जनतेनेच रस्त्यावर उतरले पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. यामागे काही मंडळी महाराष्ट्र गिळंकृत करण्याचा छुपा अजेंडा राबवीत आहे का ? असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही.

एकीकडे महाराष्ट्राचे राज्यपाल, हे महाराष्ट्राचे आहेत कि, भाजप चे हा प्रश्न पडला आहे. कारण ते आल्यापासूनच महाराष्ट्र विरोधी धोरणे राबविण्यात मशगुल आहेत. राज्याचे राज्यपाल, हे त्या राज्याचे पालक असतात. परंतु हे महाशय आल्यापासूनच काही तत्वे राबवीत आहेत. त्यांनी सुरुवातीला १२ आमदारांची नियुक्ती करायची असते. ती अद्याप केलेली नाही. हा संविधानाचा अपमान नाही का ?.

यानंतर क्रांतीबा जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले ज्यांनी समाजाला विशेष करून महिलांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला. अशा मंडळींविषयी अश्लाघ्य वक्तव्य केले. वयाची साठी पूर्ण होत असताना, हे विचार अशा संविधानिक पदावर बसलेल्या माणसाला सुचतातच कसे ? हा सर्वात मोठा प्रश्न राज्यातील जनतेसमोर आहे. त्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात कि, मी त्यांच्या मताशी सहमत नाही. परंतु त्यांना तसे म्हणावयाचे नव्हते. या विधानाला काही अर्थ आहे का ? तुम्ही राज्यपालांचे वकीलपत्र स्वीकारले आहे का?

तिसरा मुद्दा जे आमच्या महाराष्ट्राची अस्मिता आहे. आमचे प्रेरणास्थान आहे, आमचे आराध्य दैवत आहेत. असे छत्रपती शिवाजी महाराज. ते म्हणे जुन्या काळातील हिरो होते. आता नितीन गडकरी आहेत. कोणाची तुलना कोणाबरोबर आपण करतो, याचे साधे भान या माणसाला नसावे. याबद्दल देखील फडणवीस, शेलार, ते बावनकुळे म्हणतात कि, आम्ही त्यांच्या मताशी सहमत नाही.

एवढेच तुम्हाला वाटते, तर तशा माणसाला इथं आमच्या राज्यात ठेवलंय कशासाठी ? त्यांच्या वयाचा आदर ठेवून त्यांना नारळ द्या, आणि त्यांची पाठवणी करा. परंतु, याबाबत आमचे उपमुख्यमंत्री म्हणतात, कदाचित त्यांना तसे बोलावयाचे नव्हते. बोलावयाचे नव्हते मग का बोलतात ? असे अनेक प्रकार राज्यात घडत असताना बाळासाहेबांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत, असे म्हणणारे मुख्यमंत्री मुग गिळून गप्प का ? त्यांचे प्रवक्ते दिपक केसरकर याबाबत काहीच का बोलत नाहीत.

एकंदरीत खुर्ची सुटेना , असे म्हणायची वेळ या शिंदे मंडळींवर आली असावी. आणि काही मंडळी मात्र महाराष्ट्राला आतल्या आत पोखरत तर नाही ना ? असा प्रश्न सामान्य जनतेसमोर उभा रहात आहे. याबाबत आत्ता जनता च रस्त्यावर उतरल्याशिवाय चालणार नाही. आणि या राज्यपाल महाशयांना परत पाठवणार आहे.

यानंतर वेळ आली आहे, ती कर्नाटक राज्याची . त्यांचे मुख्यमंत्री म्हणतात कि, जत तालुयातील ४० गावे आमची. त्याहीपुढे जावून आत्ता सोलापूर भागातील कन्नड भाषिकांना कर्नाटकात सामील होण्याचे आवाहन करीत आहेत.. अरे काय चाललंय काय ? मुख्यमंत्री महोदय लबाडांची संगत चांगली नसते. या सगळ्यांचे पाप केवळ तुमचेच, असे म्हणायची वेळ आली आहे.

थोडक्यात काही मंडळी आपल्या महाराष्ट्राला पोखरायच्या प्रयत्नात आहे. कारण कर्नाटकात सुद्धा मुख्यमंत्री भाजप चेच आहेत. हि महाराष्ट्रातील भाजप व कर्नाटकातील भाजप यांची मिलीभगत असावी, असा प्रश्न पडल्यास वावगे ते काय ?

या सगळ्यांचे मुख्यमंत्री महोदय, आपल्यालाच उतर द्यावे लागणार आहे. करणा महाराष्ट्राचा, शिव छत्रपतींचा अपमान, हि स्वाभिमानी जनता यापुढे सहन करणार नाही. याचे आपल्याला भान असावे.