ऑफ लाईन रेशन वितरणाला परवानगी द्या, अन्यथा पॉज मशीन जमा करणार- रेशन दुकानदार संघटना
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील सर्व्हर प्रॉब्लेम मुळे रास्त भाव रेशन धान्य दुकानदारांना ऑफ लाईन रेशन वाटपाची परवानगी मिळावी, अन्यथा संघटना सर्व रेशन दुकानदारांची पॉज मशीन तहसीलदार कार्यालयात जमा करण्यात येईल, अशा इशारावजा अशा आशयाचे निवेदन शाहुवाडी तालुक्यातील रास्त भाव रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने शाहुवाडी तहसीलदार गुरु बिराजदार यांना देण्यात आले.

तालुक्यात रेशन धान्य दुकानदारांच्या वतीने जे रेशन वाटप करण्यात येते, त्यासाठी ग्राहकांचा थंब घेणे अनिवार्य असते. परंतु तालुक्यातील थंब चे मशीन सर्व्हर स्लो असल्याने सुरु होत नाही. त्यामुळे रेशन वितरणात घट होत आहे.

यासाठी रेशन वाटप ऑफ लाईन पद्धतीने केल्यास, सर्व ग्राहकांना रेशन वेळेवर वितरीत करता येईल. रेशन वेळेवर वितरीत न झाल्याने ग्राहकांच्या संतापाला दुकानदारांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी ऑफ लाईन रेशन वितरणाची परवानगी मिळावी, अशी विनंती या निवेदनात केली आहे. अन्यथा सर्व रेशन दुकानदार आपली पॉज मशीन तहसीलदार कार्यालयात जमा करतील, असा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

सदर च्या निवेदनावर उपाध्यक्ष गामाजी ठमके, नूरमोहम्मद गणी मुजावर, दामोदर शिंदे, राजाराम पाटील कांडवण आदी पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.