बांबवडे पोलीस चौकी फक्त ११२ साठीच आहे का ? कि, केवळ रेस्ट रूम ?
बांबवडे : शाहुवाडी पोलीस ठाणे चा भार कमी होण्यासाठी, त्याचबरोबर लोकांना जवळ सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बांबवडे आउट पोस्ट चौकी आधुनिक करण्याचा यशस्वी प्रयत्न वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केला होता. परंतु सद्यस्थितीत बांबवडे चौकीत तक्रार दाखल करून घेतली जात नाही. त्यासाठी लोकांना शाहुवाडी पोलीस ठाणे इथं पाठवले जाते. जर असे असेल, तर, या बांबवडे आउट पोस्ट चा उपयोग नेमका कशासाठी हा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

याबाबत काही वर्षांपूर्वीच इथं तक्रारी स्वीकारल्या जाव्यात, असे पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यासाठीच इथं आधुनिकीकरण करण्यात आले. परंतु त्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात असून, तक्रारदाराला शाहुवाडी पोलीस ठाण्याला जाण्यासाठी किमान पंचवीस किलोमीटर चे अंतर तोडावे लागते. यावर येथील पोलीस अधिकारी विचार करणार आहेत का ?

दरम्यान या पंचक्रोशीत अनेक अवैध व्यवसाय बिनबोभाटपणे सुरु आहेत. अवैध दारू विक्री, जुगार, मटका असे व्यवसाय ” उत्तम ” सुरु आहेत. याबाबत अगोदर सुद्धा वर्तमानपत्र तसेच वृत्तवाहिनी वरून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु काही काळ विश्रांती घेतल्यानंतर, हे व्यवसाय पुनश्च कोणाच्या प्रकाशात सुरु आहेत, हा प्रश्न अजूनही जनतेला पडला आहे.

शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे हे गाव सुमारे ५० गावांना एकत्र करीत आहे. याठिकाणी बाजारहाट, तसेच खरेदी-विक्री साठी पंचक्रोशीतील जनता बांबवडे बाजारपेठेला महत्व देते. त्यामुळे इथं सातत्याने वर्दळ असते. त्या अनुषंगाने बांबवडे गावाला मोठे महत्व आहे. यामुळे तक्रारी देखील इथं मोठ्या प्रमाणावर असतात. परंतु बांबवडे चौकीतून लोकांना तक्रार दाखल करण्यासाठी शाहुवाडी पोलीस ठाणे इथं पाठविले जाते. त्यामुळे बांबवडे चौकीचा नेमका उपयोग कशासाठी फक्त येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या अडविण्यासाठीच का ?

त्याचबरोबर इथं कोणत्याही गुन्ह्याची माहिती पत्रकारांना देखील मिळत नाही. त्यासाठी शाहुवाडी पोलीस ठाण्याकडेच जावे लागते. मग या पोलीस चौकीचा उपयोग फक्त ११२ अटेंड करण्यासाठीच का ? याचादेखील नवनिर्वाचित पोलीस अधिकारी श्री प्रकाश गायकवाड यांनी करावा. नाहीतर हि पोलीस चौकी फक्त रेस्ट रूम आहे का ? याचा खुलासा देखील करावा.