मलकापूर नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा प्रतिष्ठापना संपन्न
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : शाहुवाडी तालुक्यातील एकमेव नगरपरिषद असलेले मलकापूर शहर येथील सुभाष चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना संपन्न झाली.

पुरोहित रवी जोशी यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आले. पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी या सोहळ्यास आपली उपस्थिती दर्शविली.
या दरम्यान शाहुवाडी ते मलकापूर अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. ऐतिहासिक गड, किल्ल्यावरील माती, व ऐतहासिक ठिकाणाचे जल आणण्यात आले. ऐतिहासिक वारसा आणि इतिहासाची परंपरा असलेल्या शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर शहरातील सुभाष चौकात ८ फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.

मलकापूर शहराच्या वैभवात महत्वपूर्ण असणारा हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी सर्वच घटकातून उत्स्फुर्तपणे मदतीचा ओघ मिळाला. ठिकठिकाणी महिलांनी औक्षन करून, महाराजांना पुष्पहार अर्पण केले. लोकराजा अशा स्वरुपात असलेली छत्रपतींची मूर्ती आगळी वेगळी असल्याचे मत , मूर्तिकार अशोक सुतार यांनी व्यक्त केले.

मिरवणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील पेरीडकर, माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, पुतळा समिती अध्यक्ष राजू प्रभावळकर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, यांच्यासहित अनेक शिवप्रेमी नागरिकांनी यावेळी उपस्थिती दर्शविली होती.