Uncategorized

सरपंच पदाची उमेदवारी केवळ राजकारणासाठी नव्हे, तर सामाजिक बांधिलकी साठी सुद्धा – श्री भगतसिंग चौगुले


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या बांबवडे गावाच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी माझी उमेदवारी आहे. हि उमेदवारी केवळ राजकारणासाठी नसून समाजातील तळागाळातील जनतेच्या समाजकारणासाठी आहे. म्हणूनच गावाच्या विकासाचे अनेक मुद्दे आपल्या समोर मांडत आहोत, आणि ते पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही श्री महादेव ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत. असे मत श्री महादेव ग्रामविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार श्री भगतसिंग तानाजीराव चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.


ते पुढे म्हणाले कि, या अगोदर झालेले रबर स्टँप उमेदवारासारखे न होता, खऱ्या अर्थाने गावाच्या विकासकामात भर घालण्यासाठी आमची आघाडी तयार आहे.


यासाठी सगळ्यात अगोदर अनेक वर्षे सुटकेच्या प्रतीक्षेत असलेला सार्वजनिक शौचालयाचा मुद्दा आम्ही निश्चित पूर्ण करणार आहोत. कारण कोट्यावधी रुपयांची उलाढाल या बांबवडे बाजारपेठेत होत असताना, इथं येणाऱ्या ग्राहकांना त्यांचा मुलभूत हक्क मिळत नाही. तो आम्ही त्यांना मिळवून देणार आहोत. हे शौचालय केवळ पुरुषांसाठी नसून, आपल्या आया-बहिणींसाठी सुद्धा असणार आहे. यामुळे गावाची इभ्रत सांभाळली जाईल, त्याचबरोबर स्वच्छ बांबवडे यासह सुंदर बांबवडे सुद्धा करण्याचा आमचा मनसुबा आहे.


दरम्यान सगळ्यात अधिक उत्पन्न देणारी बांबवडे हि बाजारपेठ असून, या बाजारपेठेचा स्थानिक ग्रामस्थांना शेतकऱ्यांना सुद्धा लाभ व्हायला हवा. कारण या बाजारपेठेला सुमारे ५० गावे जोडली गेलेली आहेत. अशावेळी स्थानिक व्यावसायिक, सेच स्थानिक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल असो, अथवा, अन्य काही,त्याचा व्यापार करून, आपला संसार समृद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला पाहिजे. यासाठी स्थनिक शेतकरी, अथवा व्यावसायिक यांना
” बाजार कर मुक्त “व्यवसाय करू देण्याचा आमचा मनसुबा आहे. ज्या माध्यमातून इथला शेतकरी , ग्रामस्थ समृद्ध होईल. त्यांच्या खिशात देखील चार पैसे खुळखुळत राहतील, यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.


बांबवडे हे गाव मतदानाच्या दृष्टीने कमी संख्येत असले, तरी इथं भाड्याने राहणारी अनेक कुटुंबे आहेत. कोण नोकरीनिमित्त, तर कोण व्यवसायानिमित्त इथं राहिला आहे. इथं राहणारा प्रत्येक व्यक्ती श्रीमंत असेलच असे नाही. परंतु जिवन आणि मरण हे श्रीमंत असो, अथवा गरीब हे कोणालाच चुकलेले नाही. अशावेळी ज्यांची ऐपत अशा आणीबाणीच्या काळात कमी असते, अशा मंडळींसाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून अंत्यविधीचे साहित्य मोफत पुरविण्याचा आमचा संकल्प आहे. ज्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासली जाईल.


असे अनेक मुद्दे घेवून श्री महादेव ग्रामविकास आघाडी, हि शंभू महादेवाच्या साक्षीने बांबवडे गावाच्या निवडणुकीत उतरली आहे. आणि हि महादेवाची पांढर सामाजिक बांधिलकीला निश्चितच यश देईल,यात शंका नाही. असे मत आघाडी चे सरपंच पदाचे उमेदवार श्री भगतसिंग चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!