सांडपाण्याचा निचरा,आणि रस्ते यासाठी निधी आणणार- श्री सुरेश नारकर बापू
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील प्रभाग क्र.१ मधील गणेशनगर ची परिस्थिती खऱ्या अर्थाने बदलण्याची गरज आहे. येथील रस्ते, सांडपाणी, आणि इतर सुविधा आजही अपूर्ण च आहेत. यासाठी मी स्वत: प्रयत्नशील असून, निधी आणण्यासाठी सदैव तत्पर आहे. असे मत प्रभाग क्र. १ चे उमेदवार आणि गेली ३० वर्षे या मतदारसंघाची सेवा करण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे, असे श्री सुरेश नारकर यांनी एसपी एस न्यूज शी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, आजवर नेहमीच गावाच्या सेवेसाठी माझी तयारी असते. कोणत्याही चांगल्या कामासाठी आम्ही नेहमीच तयार असतो. परंतु काही मंडळी मात्र नको ते षड्यंत्र करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. अशा गोष्टींकडे मी कधीही लक्ष देत नाही. माझे काम करत रहाणे,हाच माझा स्वभाव आहे.

गेल्या पंचवार्षिक मध्ये गणेशनगर येथील गल्ली अंतर्गत रस्त्यांचे काम केले आहे. काही काम अजूनही प्रतीक्षेत आहेत. परंतु त्या कामांसाठी निधी तयार आहे. त्यामुळे मी कधीही थांबलेलो नाही. येथील रस्ते खाली आणि गटारे वर अशी परिस्थिती आहे. केवळ मुरूम टाकून रस्त्याला थुकपट्ट्या लावण्याचाच प्रयत्न झाला. येथील सांडपाण्याचा निचरा होणे, काळाची गरज आहे. परंतु ग्रामपंचायत मधील मंडळींनी याबाबत कधीही कटाक्षाने लक्ष घातले नाही. यासाठी गणेश नगर मधील काही ग्रामस्थ आणि आम्ही सगळ्यांनी श्रमदानाने हे साचलेले पाणी मार्गस्थ केले होते.

परंतु यावेळी मात्र या पाण्याचा उपयोग करून हिरवळ फुलविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जे दुकानगाळे बाजारपेठेत आम्ही निर्माण केले. ते इतर ग्रामस्थांना वितरीत झाले. यावेळी मात्र बांबवडे च्या स्थानिक ग्रामस्थांना याचे वितरण करून, खऱ्या अर्थाने बेरोजगार असणाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा निर्धार आहे.
पावसाळ्यात येथील रस्त्यांची होणारी अवस्था अतिशय दयनीय आहे. ते रस्ते कॉंक्रिटीकरण करून, येथील जनतेला चिखलापासून मुक्त करणार आहोत. इथं चार दिवसांनी येणाऱ्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आम्ही तजवीज केली आहे. त्या माध्यमातून आया-बहिणींना पाण्याची वाट पहात थांबावे लागणार नाही.

असे अनेक आराखडे तयार आहेत. या अगोदर इच्छाशक्ती ची कमतरता भासत होती. परंतु श्री महादेव ग्रामविकास आघाडी च्या माध्यामातून हे सर्व आराखडे पूर्ण करण्याचा आम्ही चंग बांधला आहे. केवळ गणेशनगर नव्हे, तर मारुती मंदिर पासून मुख्य रस्त्यापर्यंत हा रस्ता तयार केला जाणार आहे. याचबरोबर अवचितनगर मध्ये सुद्धा रस्त्यांचे नियोजन आहे. माझ्या प्रभागातील गावांतर्गत रस्ता, येथील सर्व रस्ते पूर्ण करून घेतले जातील, हा माझा शब्द आहे.

अशा गावाच्या अनेक विकास कामांसाठी आम्ही तत्पर आहोत. तेंव्हा श्री महादेव ग्रामविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे माझे आवाहन आहे.
” मत आमच्यासाठी,, आम्ही सदैव विकासासाठी. ” कटीबद्ध आहोत, असेही श्री सुरेशराव नारकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.