केदारलिंगवाडी येथील मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात ठार कि, वनखात्याच्या अपयशाच्या हल्ल्यात ?
शित्तूर तर्फ वारुण (विशेष प्रतिनधी ) : उदगिरी तालुका शाहुवाडी येथील केदारलिंगवाडी इथं बिबट्याने ४ थी इयत्तेत शिकत असलेल्या मुलीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ती मुलगी ठार झाली आहे. या घटनेचा पंचनामा शाहुवाडी वनक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी केला.

गेल्या वर्षभरात बिबट्याचे हल्ले शाहुवाडी तालुक्यात होत आहेत. हि जनावरे सरूड, सवते, शिंपे पर्यंत पोहचली, तरीही वन खाते सुस्तच होते. जुजबी उपाय योजना , कॅमेरा बसविणे, यापलीकडे वनखाते यांनी काही केले नाही. किंबहुना काही वाईट घटना घडायची, हि मंडळी जणू वाटच पहात होती.

दरम्यान घटना स्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार,राया उर्फ ( रामू ) विठ्ठल डोईफोडे हे शाहुवाडी तालुक्यातील पुसार्ले गावचे रहिवाशी असून, ते आपल्या कुटुंबासहित जनावरे चरण्यासाठी उदगिरी येथील केदारलिंगवाडी जवळील गट नं ३६ मध्ये रहात होते. दरम्यान काल दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान डोईफोडे यांची पत्नी व मुलगी जनावरे चारण्यासाठी जात असताना, मुलगी मनिषा पाणी आणण्यासाठी गेली असता, झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. मुलीने आरडा-ओरडा केल्याने जनाबाई येडगे या नातेवाईक महिला आवाजाच्या दिशेने गेल्या. त्यावेळी बिबट्या मुलीला फरपटत नेत असताना, त्यांनी पाहिले. त्यांनी त्यावेळी बोंब ठोकून सोडविण्यासाठी प्रयत्न केला. तोपर्यंत बिबट्याने मुलीवर हल्ला करून, ठार केले होते.

सदरच्या घटनेची माहिती पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील यांनी वनविभागाला कळवली. शाहुवाडी येथील वनक्षेत्र अधिकारी अमित भोसले, वाडे, बनसोडे, मुल्ला यांनी घटनास्थळावर जावून पंचनामा केला आहे.

दरम्यान परिसरात वनक्षेत्र अधिकारी आणि वन खाते यांच्याबद्दल संताप व्यक्त होत असल्याचे निदर्शनास आले.