कडवे इथं अल्पवयीन मुलीवर चुलत भावाकडून अत्याचार : आरोपीची बालसुधारगृहात रवानगी
शाहुवाडी प्रतिनिधी : कडवे तालुका शाहुवाडी इथ अल्पवयीन चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार होत होते. यामध्ये आरोपी असलेल्या तरुणाला शाहुवाडी पोलिसांनी अटक केली. तसेच कोल्हापूर येथील जिल्हा विशेष ( पोस्को ) न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, आरोपीस न्यायालयाने बालसुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीच्या आईने शाहुवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीने अल्पवयीन मुलीला घरी एकटीला गाठून तिच्यावर मे ते जुलै २०२२ पर्यंत जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुझी बदनामी करेन, अशी धमकी देखील आरोपीने पिडीतेला दिली होती.

दरम्यान या लैंगिक अत्याचारामुळे संबंधित मुलीला दिवस गेले. पिडीतेला शारीरिक त्रास झाल्याने मुलीला शासकीय दवाखान्यात दाखाल करण्यात आले.. शारीरिक तपासणी नंतर या गुन्ह्याला अखेर वाचा फुटली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाहुवाडी पोलिसात वर्दी दिली.

सदर घटनेची पिडीतेच्या आईने गुरुवार दि.२९ डिसेंबर रोजी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. शुक्रवार दि. ३० डिसेंबर २०२२ रोजी कोल्हापूर जिल्हा विशेष न्यायालयाने आरोपीला अल्पवयीन असल्याने बालसुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिले.

सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील अधिक तपास करीत आहेत.