भूसंपादन कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट थांबवा – अरुण पाटील आणि शेतकरी यांची मागणी
बांबवडे : राष्ट्रीय महामार्ग १६६ साठी शाहुवाडी तालुक्यतील जमीन संपादित झालेल्या ७५ % शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला आहे. परंतु २५ % शिल्लक राहिलेल्या जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रात त्रुटी असून त्या पूर्ण कराव्यात, यासाठी भूसंपादन कार्यालयाचे निवृत्त अधिकारी श्री आय.एम. मुल्ला शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आले होते. परंतु या कार्यालयाकडून लक्षावधी रुपयांच्या कमिशनची मलई खाल्ली जात आहे. जे कमिशन देत नाही, त्यांच्या कागदपत्रात त्रुटी काढल्या जात्तात, असा आरोप डोणोली तालुका शाहुवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील यांनी केला आहे.

डोणोली तालुका शाहुवाडी इथ आयोजित शिबिरामध्ये श्री अरुण पाटील यांनी आरोप केला आहे. दरम्यान शाहुवाडी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांकडून हा कमिशन चा मलिदा गोळा केला गेला आहे. यावेळी तक्रार निवारण करण्यासाठी शासनाच्या वतीने निवृत्त अधिकारी आय एम. मुल्ला हे शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झाले होते.

यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील यांनी भूसंपादन कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट झाला असल्याची तक्रार अधिकाऱ्यांसमोर मांडली. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता, त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा, त्याचबरोबर ज्या अतिरिक्त जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, त्या जुन्या कागदपत्रानुसार त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्याचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी देखील अरुण पाटील यांनी केली आहे.

दरम्यान उपजिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादन कार्यालयातील निवृत्त अधिकाऱ्यांना या कामासाठी का पाठविण्यात आले ? दरम्यान कार्यालयातील अधिकारी आणि एजंट यांनी सहमतीने कमिशनचा कारभार चालविला आहे. म्हणून त्यांना जनतेत न पाठवता, निवृत्त अधिकाऱ्यांना पाठवून, शासनाने पळवाट काढली असल्याची जनतेतून चर्चा ऐकावयास मिळत आहे.