साळशी ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर : तरुण आघाडी च्या हाती गावाची सूत्रे
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील साळशी हे गाव अत्यंत संवेदनशील असून, या गावात सत्ताधाऱ्यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. या गावात स्थानिक आघाडीचा विजय झाला असून, तरुण आघाडी ने विजय संपादन केल्याने, दमदार नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

साळशी तालुका शाहुवाडी इथं दोन महादेवांचे वर्चस्व आहे. माजी खासदार स्व. उदयसिंगराव गायकवाड गटाचे समर्थक असलेले माजी शिक्षण सभापती महादेवराव ज्ञानदेव पाटील हे होत. तर कर्णसिंह गायकवाड गटाचे खंदे समर्थक असलेले माजी पंचायत समिती उपसभापती श्री महादेवराव श्रीपती पाटील हे होत. यामध्ये महादेवराव श्रीपती पाटील यांचे पुत्र मागील पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस चे मानसिंगराव गायकवाड यांचे समर्थन लाभले होते. परंतु तरीदेखील येथील स्थानिक आघाडी च्या श्री बिरदेव गाव बचाव आघाडी ने सरपंच पदासह सात अधिक एक अशा आठ जागा जिंकत , ग्रामपंचायत साळशी वर स्थानिक तरुण आघाडी ने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

यावेळी साळशी गावातील महादेवराव श्रीपती पाटील यांच्या हातून सत्ता निसटली असून, गावातील तरुण आघाडीने ग्रामपंचायत सदस्य मंडळावर बाजी मारली आहे. यामध्ये माजी जि.प. सदस्य विजयराव बोरगे यांच्या पत्नी सुद्धा स्थानिक आघाडीतून विजयी झाल्या आहे.