लव्ह जिहाद, गोहत्या बंदी, धर्मांतर बंदी यासाठी एकजूट गरजेची- विराट जनाक्रोष मोर्चा संपन्न
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतरण, याबाबत कठोर कायदा करण्यासाठी शाहुवाडी तालुका समस्त हिंदू समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. या विराट मोर्चात तालुक्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते, त्याचबरोबर महिला या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
मलकापूर ते शाहुवाडी या महामार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला.
मलकापूर येथील नरहरी मंदिर येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात वेशभूषा, भगव्या टोप्या परिधान केलेले त्याचबरोबर भगवे ध्वज हातात घेवून, असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर महिलांचा सहभागही लक्षणीय होता.
लव्ह जिहाद, गो हत्या बंदी, व धर्मांतर बंदी याबाबत शासनाने कठोर भूमिका घेवून कायदा करावा. याच पार्श्वभूमीवर या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चातील जनतेने घोषणा देत शाहुवाडी येथील तहसील कार्यालयावर धडक मारली. यावेळी तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले.
यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी हिंदू एकता आंदोलन सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व गड किल्ले संवर्धन समन्वयक विक्रम पावसकर, व संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प. शिरीष मोरे यांनी लव्ह जिहाद, गोहत्या बंदी, धर्मांतर बंदी हे कायदे लवकरात लवकर अमलात आणावेत, यासाठी एकीने लढा दिला पाहिजे, असे आवाहन केले.
मोर्चात लहान मुलांसह युवक, युवती, महिला, वृद्ध, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रवीण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.