शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात बाळासाहेबांची शिवसेना प्रवेशकर्ती
बांबवडे : शाहुवाडी तालुका हा शिवसेनेचा राजकीयदृष्ट्या बालेकिल्ला मानला जातो. परंतु सध्या शाहुवाडी तालुक्यात खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना चंचूप्रवेश करताना निदर्शनास येत आहे. यामुळे शिवसेनेचे माजी आमदार श्री सत्यजित पाटील सरुडकर यांच्या समोर नवे आव्हान उभे राहताना दिसत आहे.

शाहुवाडी तालुक्यातील राजकीय स्थिती या अगोदर वेगळी होती. त्याकाळात त्यांना राजकीय विरोधक म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व जनसुराज्य शक्ती असे विरोधक होते. त्यावेळी राजकारणाच्या युद्ध भूमीवर त्यांना खूप संघर्ष करावा लागत होता. परंतु तरीदेखील त्यांना यश मिळत होते. परंतु सध्या त्यांच्या राजकीय विरोधकांमध्ये आणखी एका विरोधकाची भर पडली आहे. ती म्हणजे ” बाळासाहेबांची शिवसेना “.

बाळासाहेबांची शिवसेना हि खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटाशी हातमिळवणी केल्यामुळे शाहुवाडी तालुक्यात घुसताना दिसत आहे. दरम्यान शाहुवाडी तालुक्यात धैर्यशील माने यांना खऱ्या अर्थाने शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी आणले. त्यांना तालुक्यातील घर आणि घर दाखवले. परंतु त्याच धैर्यशील माने यांनी निवडून आल्यानंतर अवघ्या दोन ते अडीच वर्षामध्ये शिवसेनेशी फारकत घेतली. आणि एकनाथ शिंदे यांच्या नव्या पक्षात म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत जाणे पसंत केले.

ज्या जनतेने त्यांना शिवसेना म्हणून निवडून दिले, त्यांनाच ठेंगा दाखवत ते दुसऱ्या पक्षात सामील झाले. हे शाहुवाडी तालुक्यातील मतदारांचे दुर्दैव मानावे का ? असा प्रश्न तालुकावासियांसमोर उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना हा नवा पक्ष शाहुवाडी तालुक्यात रुजणार का ? याचे उत्तर जनताच चांगल्या रित्त्या देवू शकते.

त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात शिवसैनिकांनी घेतलेले कष्ट, त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला मूठमाती देत खासदार धैर्यशील माने यांनी शाहुवाडी तालुक्यात हा नवा पक्ष रुजविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या शाहुवाडी तालुक्यात गद्दारी ला स्थान नाही, हा इथला इतिहास आहे. त्यामुळे हा नवा पक्ष शाहुवाडी तालुक्याच्या राजकारणात किती ढवळाढवळ करणार आहे ? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

या नव्या पक्षाबाबत माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर हे कितपत गंभीर आहेत, हा प्रश्न सुद्धा इथ महत्वाचा असणार आहे. त्याचबरोबर येथील शिवसैनिक या नव्या पक्षाला किती गांभीर्याने घेणार आहेत, हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्वाचा असणार आहे. कारण शिव्सेनेंचे जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी तालुकाप्रमुख दत्ता पोवार आणि त्यांचे सहकारी मंडळी यांनी सुद्धा या नव्या पक्षाला तालुक्यात किती गांभीर्याने घेतले आहे. हे सुद्धा तालुकावासीयांना दिसणार आहे.

एकंदरीत शिवसेनेला छेद देवून निर्माण झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला स्वाभिमानी शाहुवाडी तालुका स्विकारणार का ? या प्रश्नाचे उत्तर जनताच चांगल्या रित्त्या देवू शकते.