थरथरनाऱ्या हातांनी केले सामान्य व्यक्तिमत्वाने ध्वजारोहण : बांबवडे ग्रामपंचायत
बांबवडे : ग्रामपंचायत बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ग्रामपंचायत बांबवडे ची निवडणूक काही दिवसांपूर्वीच संपन्न झाली. या निवडणुकीत महादेव ग्रामविकास आघाडी चे सर्व उमेदवार विजयी झाले. तसेच लोकनियुक्त सरपंच म्हणून एक नवा चेहरा श्री भगतसिंग तानाजीराव चौगुले यांच्या माध्यमातून जनतेने निवडून दिला आहे. त्यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून दोन पिढ्या गावाची सेवा करणारे गावचे शिपाई श्री महादेव भिवा कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक करण्यात येत आहे.

श्री महादेव भिवा कांबळे यांची सुमारे ३० वर्षे ग्रामपंचायत शिपाई म्हणून कारकीर्द चांगली सुरु आहे. या अगोदर त्यांचे वडील भिवा कांबळे हे गावचे शिपाई म्हणून कार्यरत होते. या संकल्पनेमुळे जातीभेद आणि वर्ण व्यवस्थेला फाटा देत, समानतेचा संदेश जनतेला देण्याचा सुविद्य प्रयत्न नूतन सदस्य व सरपंच ,उपसरपंच यांनी दिला आहे.

दरम्यान ध्वजारोहणाचा मान श्री महदेव कांबळे यांना मिळाल्यामुळे त्यांचे अंत:करण भरून आलेलहायला मिळाले. एकेकाळी जे हात ध्वजाच्या दोऱ्या बांधताना सराईतपणे चालत होते. तेच हात आज ध्वज फडकवताना थरथरताना दिसले. एकंदरीत काय सामान्य माणसाला किमत द्यायला प्रत्येकाने शिकले पाहिजे. हेच या नव्या चेहऱ्यांनी ग्रामस्थांना दाखवून दिले.

या कार्यक्रम सोहळ्यास सरपंच सर्वश्री भगतसिंग चौगुले, उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील, सुरेश नारकर, सीमा निकम, कविता प्रभावळ, दीपक निकम, मनीषा पाटील, सुनिता कांबळे, दिग्विजय पाटील, शोभा निकम, विद्यानंद यादव, वंदना बंडगर ,आणि सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते , प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.