विशाळगडावर सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर दारू पिणाऱ्यांना न्यायालयाची शिक्षा
बांबवडे : विशाळगड इथं दारूबंदी असतानाही उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांना न्यायालयाने १०००/-रुपये दंड व १५ दिवस कैदेची शिक्षा ठोठावली आहे.

विशाळगड येथील ऐतिहासिक ठिकाणी अस्वच्छता, दुर्गंधी, तसेच दारू पिवून धिंगाणा घालणाऱ्यांमुळे इतिहासप्रेमी जनतेतून असंतोष निर्माण होत आहे. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या सूचनेनुसार दि. २० जानेवारी २०२३ रोजी कडक मोहीम राबविण्यात आली.

या दरम्यान गडावर दारू पिण्यास बंदी असतानाही, उघड्यावर दारू पिताना काही मंडळी पोलिसांना आढळली. त्यांच्याविरोधात शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने प्रत्येकी १०००/- रुपये दंड व १५ दिवसांची कैद अशी शिक्षा ठोठावली.

सदर गुन्ह्याचा तपास पाच दिवसात पूर्ण करून, पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, पोलीस नाईक बाबासो चौगुले, सागर रोहिले, सचिन चव्हाण, सत्यजित ढाले यांनी तपास केला. याबाबत त्यांचे पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले. इमाने इतबारे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने अभिनंदन.