गरीब ग्रामस्थांना अंत्यविधी साहित्य मोफत – बांबवडे ग्रामसभेतील ऐतिहासिक ठराव, तर १० टन लाकूड ची देणगी
बांबवडे : ग्रामपंचायत बांबवडे तालुका शाहुवाडी ची २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत गरीब कुटुंबांना अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य ग्रामपंचायत मोफत देणार असल्याचा ठराव ग्रामसभेत संपन्न झाला, आणि आणखी एक जनहितार्थ अभिनव उपक्रम नव्या ग्रामपंचायत सदस्य मंडळाने घेतला. यास्तव सरपंच श्री भगतसिंग तानाजीराव चौगुले, उपसरपंच श्री स्वप्नील अशोकराव घोडे – पाटील व सदस्य मंडळाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

हि ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी बुजुर्ग व्यक्तिमत्व असलेले श्री बापू चौगुले गुरुजी यांनी मोफत अंत्यविधी साहित्य देण्याचा ठराव झाल्यानंतर, यासाठी १० टन जळावू लाकूड व २००० हजार शेणी या कार्यास मोफत देण्याचे जाहीर केले. यावेळी देखील उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या दातृत्वाचे अभिनंदन केले.

यावेळी एन.एम.एम.एस. स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झालेबद्दल कु. वैष्णवी श्रीकांत सिंघण हिचा बुके देवून सत्कार करण्यात आला.याचबरोबर इतर राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे देखील बुके देवून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी १ कोटी ९७ लाख रुपयांची जल योजना गावासाठी मंजूर झाल्याचे पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी जाहीर केले.

यावेळी कोविड काळात आशा भगिनींनी केलेल्या कामाचा भत्ता अद्याप तत्कालीन ग्रामपंचायत मंडळाने दिला नसल्याची तक्रार केली. यावेळी आशा भगिनींना त्यांचा कोविड काळात प्रलंबित असलेले उर्वरित देयक तत्काळ देण्यात यावे, असे देखील ग्रामसभेत ठरले.

यावेळी ग्रामसभेच्या प्रोसिडिंग चे वाचन प्रकाश निकम ,दीपक पाटील यांनी केले.

याचबरोबर अनेक बाबींवर ग्रामसभेत प्रश्नोत्तरे झालीत.
प्रारंभी ग्रामसेवक आर.बी. कुरणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

यावेळी सरपंच भगतसिंग चौगुले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले कि, गावाने आमच्यावर दाखवलेला विश्वास निश्चित सार्थ करणार आहोत. यापुढे सर्व प्रथम गावाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल. यासाठी विविध लोकप्रतिनिधींकडून निधी आणणार आहोत. आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आपला ऋणी आहे. तसेच यापुढे देखील असाच विश्वास आमच्यावर ठेवल्यास गावाचा चेहरा मोहरा बदलून गाव निश्चितच प्रगतीच्या दिशेकडे वाटचाल करेल. असेही सरपंच भगतसिंग चौगुले यांनी सांगितले.

यावेळी श्री बापू चौगुले गुरुजी मुकुंद पवार, सुरेश नारकर आदी मंडळींनी मनोगते व्यक्त केलीत.
कार्यक्रमाचे आभार उपसरपंच स्वप्नील घोडे – पाटील यांनी मानले. यावेळी विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांनी गावाच्या विकासासाठी जल योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.

यावेळी तलाठी, शिक्षक, आशा भगिनी, अन्य प्रशासकीय अधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.