नवीन पाणीपुरवठा योजना राजकारणाच्या विळख्यात ? : साळशी त पाणी पेटतंय ?
बांबवडे : साळशी तालुका शाहुवाडी येथील शासनाच्या ” जल जीवन मिशन ” अंतर्गत सुमारे पावणे पाच कोटी रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना हि साळशी सह भोसलेवाडी, पोवारवाडी या वाड्यांनाही वरदान ठरणार आहे. असे असताना केवळ आपल्याला काम मिळाले नाही, या असूयेपोटी खोडसाळपणे या जल योजनेला विरोध केला जात आहे. असे असले, तरी हि योजना यशस्वीरीत्या कार्यरत होईल, आणि गाव तसेच वाड्या टँकरमुक्त होतील, अशा आशयाचे प्रसिद्धीपत्रक माजी सरपंच संदीप पाटील यांनी पत्रकारांना प्रसिद्धी साठी दिले आहे.

आपल्या प्रसिद्धी पत्रकात माजी सरपंच पुढे म्हणाले कि, शासनाने दरडोई खर्चाचा भार लक्षात घेवून, या योजनेला हिरवा कंदील दिला आहे. दरम्यान विरोधक गावात येणाऱ्या विकासकामांना विरोधासाठी विरोध करीत असल्यास , आम्ही देखील जशास तसे उत्तर देवू शकतो, परंतु गावाच्या विकासाच्या आड येणे, हि आमची प्रवृत्ती नाही.

साळशी, भोसलेवाडी, पोवारवाडी अशी एकत्र ग्रुप ग्रामपंचायत आहे. या गावाला पूर्वी पासून पाण्याची टंचाई आहे. यापूर्वी सायपण पद्धतीने भोसलेवाडी, पोवारवाडी यांना डोंगरातील पाणी मिळत होते. दरम्यान पावसाळ्यानंतर काही महिन्यातच पाण्याची टंचाई भासू लागते. दरम्यान सुमारे २० वर्षांपूर्वी स्वजलधारा योजने अंतर्गत गावाला पाणी पुरवठा योजना आणली गेली. परंतु बरीच वर्षे झालेने पाण्याच्या पाईप ना ठिकठिकाणी गळती लागत आहे. त्यामुळे मूळ साळशी गावाला एक दिवस आड पाणी पुरवठा होतो. तर भोसलेवाडी, पोवारवाडी येथील ग्रामस्थांना टँकर ने पाणीपुरवठा करावा लागतो. दरम्यान भोसलेवाडी इथं पाण्यासाठी विहिर आहे. परंतु तिची दुरुस्ती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत नवीन पाणी पुरवठा योजना गावासाठी आल्यास गावाचे व वाड्यांचे पाण्याचे दुर्भिक्ष कायम स्वरूपी मिटून जाईल, आणि ग्रामस्थांना मुबलक पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल.

नवीन येवू घातलेल्या पाणी पुरवठा योजनेत फिल्टर हाऊस असल्याने स्वच्छ पाणी ग्रामस्थांना मिळेल. तसेच स्वतंत्र टाकी बांधणेसाठी,निधी उपलब्ध आहे. तसेच योजनेत सौर उर्जेचे नियोजन असल्याने लाईटबिल अधिक वाढून ग्रामस्थांवर त्यांचा बोजा पडणार, असे विरोधकांकडून भासवले जात आहे. परंतु सौर उर्जेचे नियोजन असल्याने तितक्या मोठ्या प्रमाणात विजेच्या बिलाचा बोजा ग्रामस्थांवर बसणार नाही. त्यामुळे विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध करण्याचा खटाटोप करू नये.

दरम्यान सदर पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी दिला गेलेला ठराव दस्तूर खुद्द विद्यमान सरपंच आनंदराव रंगराव पाटील त्यासाठी सूचक म्हणून आहेत. असे असताना, केवळ आत्ता विरोधात गेल्याने ते या योजनेला विरोध करीत आहेत. तसा विरोध होता, तर त्यावेळी आपण सूचक पदाची भूमिका का घेतली, त्यावेळी आपल्याला या वीजबिलाची भीती वाटली नाही का ? असा प्रश्न सुद्धा माजी सरपंच संदीप पाटील यांनी उपस्थित केला आहे.

सदरची योजना काल तयार केलेली नसून, या योजनेसाठी गेले वर्षभर पाठपुरावा केला जात आहे.यासाठी विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे, खासदार धैर्यशील माने, मुन्ना महाडिक,या मंडळींच्या विशेष प्रयत्नातून हि योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ राजकारणासाठी या योजनेला विरोध करू नये, अन्यथा याचे परिणाम संपूर्ण गावासहित वाड्यांना देखील भोगावा लागेल, आणि गाव टँकरमुक्त करण्याचे स्वप्न, स्वप्नच राहील ,असे माजी उपसभापती महादेवराव पाटील यांनी या मध्ये नमूद केले आहे.