साळशी ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या खिळखिळी करण्यासाठी नव्या योजनेचा घाट – सरपंच आनंदराव पाटील
बांबवडे : साळशी तालुका शाहुवाडी इथं ” जल जीवन मिशन ” योजने अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना आणून, त्याचा अनाठायी खर्च ग्रामस्थांच्या माथ्यावर मारण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. या माध्यमातून मुळातच ग्रामपंचायत ची अनेक बिले थकवून ठेवलेली असताना, ग्रामपंचायत चा आर्थिक कणा मोडून, तिची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा हा कुटील डाव पराभूत मानसिकतेने रचलेला आहे. परंतु नव्याने ग्रामस्थांनी निवडून दिलेले सदस्य मंडळ अशा कुटील कारस्थानांना घाबरणार नसून, असे झालेले प्रयत्न या योजनेला कडाडून विरोध करून मोडीत काढले जातील, असा इशारा नूतन लोकनियुक्त सरपंच आनंदराव रंगराव पाटील आणि सहकारी मंडळी यांनी संबंधितांना पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

ते पुढे म्हणाले कि, ज्यावेळी सत्ता परिवर्तन झाले, त्यावेळी ग्रामपंचायत ची पाणीपट्टी , घरफाळा सुमारे २२ लाख रुपये थकीत आहेत. तसेच ग्रामपंचायत च्या कर्मचाऱ्यांचे सुमारे सहा महिन्यांचे वेतन थकीत आहे. एकंदरीत साळशी ग्रामपंचायत ची आर्थिक क्षमता कमकुवत झाली असताना, विकासकामांच्या नावाखाली संबंधित मंडळी मलिदा लाटण्याचा दुर्दैवी प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान साळशी, पोवारवाडी, भोसलेवाडी मिळून सुमारे ९ पाण्याचे स्त्रोत आहेत. एकूण ५ विंधन विहिरी आहेत. त्यापैकी ३ विहिरी व्यवस्थित पाणी पुरवठा करीत आहेत. पोवारवाडी, येथील बोअर चे सौर उर्जेचे पॅनेल ना दुरुस्त झाले आहे. केवळ पैसे नसल्याने त्याची दुरुस्ती झालेली नाही. तसेच इतर २ विहिरीवर दुरुस्ती करून त्याचे पाणी देखील मिळू शकते. परंतु असे न करता, ग्रामपंचायत ची आर्थिक क्षमता नसतानाही केवळ स्वार्थापोटी, आणि ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या खिळखिळी करण्यासाठी या नव्या पाणी योजनेचा घाट संबंधित मंडळींनी घातला आहे.

या अगोदर गावाला स्वजलधारा योजनेतून पाणी मिळत होते. त्याची पाईप लाईन दुरुस्त करून, ती योजना कार्यान्वित केली असती, तर गावावर पडणारा आर्थिक अतिरिक्त बोजा थांबला असता. दरम्यान भोसलेवाडी व पोवारवाडी इथं टँकर ने पाणी पुरवावे लागते, असे विरोधकांचे म्हणणे चुकीचे आहे. इथं देखील पाणीसाठा मुबलक आहे. फक्त वीज गेली तर पाणी उपसण्याचे पंप बंद होतात. त्यावेळी टँकर ची गरज भासते. त्यामुळे गाव टँकरग्रस्त असून, ते टँकरमुक्त करण्यासाठी हि योजना कार्यान्वित करीत आहोत. हे थोतांड आहे. अधिकारी वर्गाला दाखवलेला बागुलबुवा असून, त्या माध्यमातून स्वत:ची तुंबडी भरण्याचे हे प्रयत्न आहेत.

तेंव्हा सदरची योजना कोणत्याही परिस्थितीत आम्ही गावात राबवू देणार नसून, वेळ पडल्यास न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावायला आम्ही मागे पडणार नाही. असे देखील सरपंच आनंदराव पाटील आणि सहकारी मंडळींनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान ग्रामपंचायत ची विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी आम्ही नवनियुक्त शिलेदार समर्थ आहोत. गावाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक,तसेच क्रीडा विषयक विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. वरेवाडी तालुका शाहुवाडी येथील जुनी सायपण पद्धतीची पाणी योजना नुतनीकरण करून, त्याचे पाणी गावाला देण्याचे आमचे यशस्वी प्रयत्न असणार आहेत. तसेच गाव तलावाची दुरुस्ती व सुशोभीकरण करून, गावची भूजल पातळी वाढविण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

तात्पर्य साळशी गाव, पोवारवाडी, भोसलेवाडी या संपूर्ण गावाला शुद्ध आणि मुबलक पाणी कमी खर्चात ग्रामपंचायत वर आर्थिक बोजा न देता, पाणी देण्याचे आमचे अभिवचन आहे, असेही सरपंच आनंदराव पाटील यांनी सांगितले.