आंबा घाटातील चक्री वळणावरून ट्रक सव्वाशे फुट दरीत कोसळला – जीवितहानी नाही
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील आंबा घाटात असलेल्या चक्री वळणावर साखरेचा ट्रक, चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने सव्वाशे फुट खोल दरीत कोसळला आहे. दरम्यान सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही. केवळ दैव बलवत्तर म्हणून चालकाचे प्राण वाचले आहेत. दरम्यान सदर अपघाताची नोंद साखरपा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी कि, आज दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला आहे. ट्रक चालक राणा ईरा चावडा वय ६२ वर्षे रहाणार पोरबंदर गुजरात हे कर्नाटक येथून साखर घेवून जयगड ला निघाले होते. आंबा घाटातील चक्री वळणावर येताच, त्यांचा ट्रक वरचा ताबा सुटल्याने, ट्रक खोल दरीत कोसळला आहे. ट्रक दरीत कोसळताना दरीत असलेल्या झाडांमुळे वेगात न जाता, अडकत निघाला होता. यामुळे केबिन मध्ये अडकलेले राणा चावडा यांना अमर पारळे व त्यांच्या मित्रांनी मदत करून केबिन मधून बाहेर काढले.

यानंतर त्यांना आंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले.

सदर घटनेचा तपास साखरपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, यांच्या मार्गदर्शनाखाली सागर उगाळे, प्रताप वाकरे करीत आहेत.