८० वर्षांचे चिरतरुण व्यक्तिमत्व : माजी आमदार श्री बाबासाहेब पाटील सरुडकर दादा
बांबवडे : शाहुवाडी – पन्हाळा विधानसभा मतदार संघाचे बुजुर्ग नेते सन्माननीय माजी आमदार श्री बाबासाहेब पाटील सरुडकर दादा यांचा आज ८० व वाढदिवस संपन्न होत आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा .

मतदारसंघातील हे बुजुर्ग नेतृत्व आज ८० वर्ष पूर्ण करतंय. या सह्याद्री सम नेतृत्वाने अनेक राजकीय आणि सामाजिक पावसाळे पाहिले आहेत. अनेक नेतृत्वासोबत त्यांनी काम केले आहे. त्यांना सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव आहे. जिल्हा परिषद पासून आमदारकी पर्यंत अनेक भूमिका त्यांनी बजावल्या आहेत. त्यामुळे त्यांना सामाजिक अडचणींची जाणीव आहे. १९७२ साली पडलेल्या दुष्काळा वेळी स्व. माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या सोबत त्यांनी तालुक्यात अनेक पाझर तलाव निर्माण करून, तालुका तहान मुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे.

त्यानंतर आमदारकीच्या माध्यामातून तालुक्यात अनेक विकासकामे त्यांनी ओढून आणली. शिवाशाहू महाविद्यालय च्या माध्यमातून शैक्षणिक यज्ञकुंड त्यांनी चेतवला, त्यातून त्यांनी अनेक यशस्वी तरुण निर्माण केले. असे हे व्यक्तिमत्व समाजाला नेहमीच भावले. कोणत्याही प्रकारची कोणाचीही फसवणूक न करता, जे काम होणार आहे, ते होणार, आणि जे होणार नाही ते नाही,असे सडेतोड सांगत,लोकांना झुलवत ठेवण्याचा धंदा त्यांनी कधी केला नाही.

असे हे स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व वयाची ८० वर्षे पूर्ण करीत असताना, तालुक्याला आणि समाजाला हा एक मोठा आशीर्वाद आहे, असे मानायला हरकत नाही. अशा या व्यक्तिमत्वाला परमेश्वर उदंड आयुष्य देवो, हीच सदिच्छा.