विद्यामंदिर सावे च्या मुख्याध्यापिका सौ. शोभा शिवाजी पाटील राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
बांबवडे : विद्यामंदिर सावे तालुका शाहुवाडी च्या मुख्याध्यापिका सौ शोभा शिवाजी पाटील यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला असून, हा पुरस्कार त्यांना पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या या कर्तुत्वास्तव त्यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.

सौ. शोभा शिवाजी पाटील मॅडम या सावे येथील विद्यामंदिर च्या प्रभारी मुख्याध्यापिका आहेत. तरी सुद्धा त्यांनी शाळेसाठी आपले सर्व योगदान देवून शाळेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. तसं पाहता सावे हे गाव छोटं आहे. परंतु येथील ग्रामस्थांना एकत्र आणून त्यांनी शाळेसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत.

सौ शोभा पाटील मॅडम यांनी शैक्षणिक क्षेत्रात गेली ३० वर्षे दर्जेदार अध्यापन करून दर्जेदार भावी पिढी निर्माण करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. पाटील मॅडम यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.

त्यांनी आपल्या सकल व वैविध्यपूर्ण अध्यापनाद्वारे काम केलेल्या प्रत्येक शाळेत ( शाहुवाडी, पिशवी, साळशी,सावे ) सर्वांगीण गुणवत्ता व संस्कारक्षम पिढी घडविण्याचे त्यांनी काम केले आहे. शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध, या स्पर्धा परीक्षेत त्यांचे आजपर्यंत अनेक विद्यार्थी गुणवत्ता धारक आहेत. याशिवाय सांस्कृतिक, कला, क्रीडा, विज्ञान आदी स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या शाळांना विविध स्तरावर भरघोस यश मिळवून दिले आहे.

यासोबतच त्यांनी वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सुमारे ५००० पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. याशिवाय ग्रामीण महिलांचे सबलीकरण, ग्रामीण कलांची जपणूक, विविध सामाजिक प्रश्न यावर त्यांनी काम केलेलं आहे.
त्यांच्या या विविध कामांसाठी त्यांना हा राज्यशासनाचा पुरस्कार देण्यात आला आहे. तालुक्यातील विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.