कन्या विद्यामंदिर मध्ये चार वर्गांसाठी केवळ एक शिक्षक : महिलादिनी चिमुकल्या महिलांचा रास्ता रोको
मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर येथील कन्या विद्या मंदिर मध्ये शिक्षकांची वानवा असूनसुद्धा ढिम्म प्रशासन याबाबत काहीही करायला तयार नाही . अशा प्रशासनाच्या विरोधात मलकापूर येथील विद्यार्थी व पालक बुधवार दि.८ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन सहित शाळेला टाळे ठोको आंदोलन देखील करणार आहेत. रास्ता रोको विठ्ठल मंदिर मलकापूर इथं करण्यात येणार आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, कन्या विद्यामंदिर मलकापूर इथं १लि ते ४ थी असे वर्ग आहेत. या शाळेसाठी जिल्हा परिषद कडून केवळ दोनच शिक्षक मिळाले होते. यापैकी एका शिक्षकांची बदली झाली आहे. म्हणजे चार वर्ग असतानाही इथं केवळ एकच शिक्षक उरले आहेत. अशी दयनीय अवस्था या कन्या विद्यामंदिर ची झालेली आहे.

एकीकडे जागतिक महिला दिन साजरा करीत असताना, मुलींच्या शिक्षणाची हि दयनीय अवस्था प्रशासनाला दिसत नाही का ? असा प्रश्न इथल्या पालक वर्गात उपस्थित होत आहे. परंतु शाहुवाडी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी यांना ८ फेब्रुवारी रोजी निवेदन देवून सुद्धा टाळाटाळ केली जात आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच कारण फेब्रुवारी महिन्यात आलेल्या निवेदनाला दिले होते. त्यानंतर मात्र त्या निवेदनाला केवळ वाटाण्याच्या अक्षता लावल्या. परंतु त्यानंतर एक महिन्याचा कालावधी मिळूनसुद्धा यामध्ये बदल झाल्याचे दिसत नाही.

म्हणूनच या शाळेतील पालक व विद्यार्थी येत्या ८ मार्च ला म्हणजेच महिला दिन दिवशीच या चिमुकल्या कळ्यांना शिक्षक मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. या दिवशी इतर नागरिकांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी होवून, खऱ्या अर्थाने महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकांच्या वतीने करण्यात येत आहे.