जागतिक महिला दिनी चिमुकल्या महिलांचे रास्ता रोको आंदोलन संपन्न
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते )
कन्या विद्या मंदिर मलकापूर शाळेच्या विद्यार्थिनींना आज बुधवार दि. 8 मार्च 2023 रोजी, जागतिक महिला दिनाच्या दिवशी स्वतःच्या हक्काच्या शिक्षणासाठी शिक्षक मिळावा यासाठी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करावे लागले.


मार्च २०२२ पासून पालक, शिक्षक मिळवण्यासाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन देत आले असून दिलेल्या निवेदनाचा काही परिणाम न झाल्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलन करणे भाग पडले. हे आंदोलन कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर या ठिकाणी करण्यात आले. आंदोलनाची तीव्रता व झालेला रस्ता रोको पाहता, प्रभारी गट शिक्षण अधिकारी जयश्री जाधव यांना उपस्थित राहणे भाग पडले. यावेळी पालक व नागरिकांच्या प्रतिक्रिया व घोषणा देण्यात आल्या, सावित्रीच्या लेकी आम्ही, शाळेसाठी झालो पोरक्या/ पटसंख्या कमी असण्याचे कारण शोधा, गावातील विद्यार्थी गावातच शिक्षण घेतील, अशी उपाययोजना करा, मलकापूर मधील शिक्षणाचा दर्जा सुधारा.अशा विविध घोषणा देण्यात आल्या.


हे आंदोलन तासभर चालू राहिल्याने चिमुकल्यांना तासभर उन्हात महामार्गावर बसावे लागले. आंदोलनाचा प्रभाव एवढा मोठा होता की, आंदोलन संपताच अर्ध्या तासात एक शिक्षक प्रिया बापुसो पाटील कन्या विद्या मंदिर मलकापूर शाळेत उपस्थित झाल्या व उद्या दुसरे शिक्षक उपस्थित राहणार, असे दोन शिक्षक या आंदोलनामुळे शाळेस मिळाले. यावेळी एस. पी. एस. न्यूज ला प्रतिक्रिया देताना गटशिक्षण अधिकारी जयश्री जाधव यांनी सांगितले,

या शैक्षणिक वर्ष अखेर काम करण्यासाठी दोन शिक्षकांची नेमणूक व शाळेच्या खोल्यांची व्यवस्था करणेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लवकर कळवले जाईल असे सांगितले. यावेळी उपस्थित शाळेचे विद्यार्थी, पालक, माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, शिक्षक, माजी नगरसेवक, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

आंदोलनावेळी शाहूवाडी पोलीस उप-निरीक्षक प्रियांका सराटे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त करण्यात आला.