कोकणच्या प्रवेशद्वाराला न्याय कधी मिळणार ? :१३७ वर्ष जुना पुल
मलकापूर प्रतिनिधी :
कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या शाळी पुलाच्या दुरुस्तीकडे संबंधीत विभागाकडे लक्ष वेधून देखील दुर्लक्ष केले जात आहे . याबाबत नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे . या सर्व बाबींची दखल घेऊन, शाळी पुलाची दुरुस्ती तीन दिवसात सुरू करावी . अन्यथा यापुढे मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करण्याचा इशारा, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर यांच्यासह नागरिकांनी शाळी पुलावर केलेल्या आंदोलन प्रसंगी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांना दिला आहे. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
मलकापूर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या शाळी पुलाला १३७ वर्षापेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. आजच्या वेळी अतिशय विचित्र अवस्थेत पूल उभा आहे. पुलाच्या दोन्ही बाजूची दगडं निखळून पडली आहेत. तर पुलाचीही दुरावस्था झाली आहे.
याबाबत माजी उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर यांच्यासह सर्व पक्षांच्या वतीने पुलाची दुरुस्ती करावी, याबाबत रस्ता रोको करण्यात आला होता. पुलाच्या दुरुस्तीकडे तात्काळ लक्ष द्यावे. या मागणीसाठी नागरिक पुलावरच भर उन्हात रस्त्यातच ठाण मांडून बसले होते. आमची मागणी मान्य केल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.
पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट तात्काळ करा. पुलाची दुरुस्ती ३ दिवसात सुरू करा. तीन दिवसात जर पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही, तर नागरिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला. यावेळी प्रवीण प्रभावळकर, सुहास पाटील यांनी पुलाची झालेली दुरावस्था याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
दरम्यान नॅशनल हायवेचे अधिकारी व्ही.एन. पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. मात्र आंदोलकांना समाधानकारक उत्तर न दिल्याने काही वेळ आंदोलक व अधिकारी यांच्यात चांगलीच चर्चा झाली, मात्र आंदोलकांना समाधानकाऱक उत्तर न मिळाल्याने आंदोलन आक्रमक झाले होते. अखेर आपल्या भावना आणि मागणी वरिष्ठांकडे पाठवतो, असे आश्वासन दिल्यानतंर आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनात माजी नगरसेवक सुहास पाटील, माजी उपनगराध्यक्ष भारत गांधी, माजी नगरसेवक विकास देशमाने, किशोर सनगर, माजी नगरसेवक सुभाष कोळेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू केसरे, संजय वाकडे, अविनाश सोनटक्के, संजय भोपळे, महेंद्र शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.