थेरगावच्या आखाड्यात भोला पंजाब ची राकेश जम्मू वर घिसा डावावर मात


बांबवडे : देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या 113 वी जयंती निमित्त पाडव्या दिवशी थेरगाव( ता शाहुवाडी) येथे भव्य आणि चटकदार अशा कुस्त्यांचे मैदान कुस्ती शौकिनांना पहायला मिळाले. सदरचे मैदान पैलवान पोपटराव सर्जेराव दळवी संस्थापक देशभक्त रत्नाप्पा अण्णा कुंभार समाजसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी केले होते. यामध्ये पंजाब, हरियाणा दिल्ली सह जिल्ह्यातील विविध पैलवानांनी सहभाग नोंदवला होता.


पंजाबचे महान भारत केसरी पैलवान भोला पंजाब या पैलवानाने जम्मू केसरी पैलवान राकेश जम्मू याला घिसा डावावर आसमान दाखवत एक लाख 25 हजार आणि गदा पटकावली. पैलवान अमित दिल्ली विरुद्ध प्रवीण कुमार हरियाणा यांच्यामध्ये काटा लढत झाली यामध्ये पैलवान अमित दिल्ली यांनी पैलवान प्रवीण कुमार यांच्यावर मात केली. उद्योग रत्न रवींद्र सदानंद फाटक बांबवडे यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपये आणि चषक विजेता पैलवान अमित यास रोहित फाटक (नंदू शेठ) यांच्या हस्ते यावेळी देण्यात आला.


तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पंजाब केसरी सचदेवीसिंह पंजाब विरुद्ध अजित पाटील महाराष्ट्र चॅम्पियन यांच्यामध्ये झाली. यामध्ये काही सेकंदात अजित पाटील यांनी कुस्ती ही जिंकली. या कुस्तीला 75 हजार रुपये आणि चषक प्रदान करण्यात आला.


चौथ्या क्रमांकाच्या कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान उदय खांडेकर विरुद्ध शाहू आखाडा पैलवान रणवीर पाटील यांच्यामध्ये झाली ही कुस्ती उदय खांडेकर यांनी जिंकली.


पाचव्या क्रमांकाची कुस्ती मोतीबाग तालमीचे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान महेश नलवडे विरुद्ध नॅशनल चॅम्पियन दिल्ली पैलवान अशोक कुमार यांच्यात झाली. यामध्ये पैलवान महेश नलवडे हे विजयी झाले. सहाव्या क्रमांकाची कुस्ती पैलवान करतार कांबळे पेरीड विरुद्ध अंकुश काकडे शाहू आखाडा अशी लढत झाली यामध्ये पेरिडच्या करतार कांबळे यांनी अंकुश काकडे याला आसमान दाखवले. सातव्या क्रमांकाची कुस्ती प्रणव रेडेकर नरसिंह तालीम थेरगाव विरुद्ध पैलवान सागर नाईक येवलुज यांच्यामध्ये झाली यामध्ये प्रणव रेडेकर यांनी मैदान मारले.


सातव्या नंबरच्या कुस्तीमध्ये विराजसिंह पोपटराव दळवी थेरगाव विरुद्ध पैलवान अक्षय आनुसे वाळवा यांच्यामध्ये झाली यामध्ये विराज सिंह पोपटराव दळवी हे काही सेकंदात विजयी झाले.


यावेळी महिलांच्या कुस्तीमध्ये पैलवान श्रद्धा कुंभार बोरपाडळे विरुद्ध वैष्णवी यादव चंदुर या दोघींच्या मध्ये लढती झाल्या. यामध्ये श्रद्धा कुंभार ही महिला पैलवान जिंकली.


शाहुवाडी तालुक्यातील थेरगाव मध्ये या झालेल्या कुस्ती मैदानामध्ये कोल्हापूर, सांगली जिल्हा सह परराज्यातील पैलवान यांनी चांगलेच यावेळी मैदान गाजवली.


एक नंबरच्या कुस्तीसाठी संपूर्ण कुस्ती सेवकांचे लक्ष लागले होते, परंतु येथे महान भारत केसरी भोला पंजाब विरुद्ध जम्मू केसरी पैलवान राकेश जम्मू ही कुस्ती डोळ्याचे पारणे फेडणारी होती. श्वास रोखून कुस्ती शौकिनांनी या कुस्तीचा आनंद घेतला. घिसा डावावर भोला पंजाबी यांनी पैलवान राकेश जम्मू यास आसमान दाखवले. आणि प्रेक्षकांनी भोला पंजाबी यास डोक्यावर घेतले.


यावेळी के डी सी बँकेचे संचालक रणवीर गायकवाड, उद्योगपती तानाजी चौगुले, उद्योगपती रोहित फाटक, पैलवान विजय बोरगे, माजी सभापती सम्राट सिंह नाईक, हिंदुराव आळवेकर उपाध्यक्ष नवी मुंबई तालीम, डॉक्टर दीपक पाटील, पैलवान विजय डोंगरे (सर), विजय रेडेकर, बापूसो कुशीरकर, तानाजी दळवी, ब्रह्मदेव पाटील, दादा खोपडे. उत्तम दळवी इंजिनियर, उदय फाळके इंजिनियर, संग्राम घाटगे उप सरपंच, भीमराव पाटील, विकास चिखलकर आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.


यावेळी पैलवान वस्ताद ईश्वरा पाटील, पैलवान सर्जेराव पाटील, सुशांत निकम, राहुल सावंत ,पैलवान दिलीप महापुरे, पैलवान संजय हारुगडे, पैलवान अर्जुन बादरे, विष्णुपंत चौगुले यांना देशभक्त रत्नाप्पा कुंभार कुस्ती भूषण पुरस्कार तसेच उद्योग रत्न सर्वोत्कृष्ट खेळाडू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुस्ती निवेदक म्हणून ईश्वरा पाटील बापू यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. नरसिंह तालीम मंडळ थेरगाव ने उत्कृष्ट नियोजन केले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!