शाहुवाडी तालुक्यात केवळ राजकारण च चालणार का ? ; संतप्त शेतकऱ्यांचा प्रश्न
शाहुवाडी प्रतिनिधी ( संतोष कुंभार ) : शाहुवाडी तालुक्यातील कडवे येथील पेठ गौंड या भागात आवश्यक असणाऱ्या विद्युत ट्रान्स्फार्मर च्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून, सध्या सुरु झालेल्या उन्हामुळे शेतकऱ्यांची पिके वाळून निघाली असून, विद्युत ट्रान्स्फार्मर च्या अभावी शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

निधी अभावी मंजूर असलेला डीपी अडकून पडल्याने, शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

कडवे येथील पेठ गौंड शेत शिवारात १४० एचपी च्या मोटर सुरु आहेत. याठिकाणी मागील तीन वर्षांपासून सातत्याने ट्रान्स्फार्मर जळत आहे. सातत्याने शेतकरी बांधवांना हा प्रश्न भेडसावत आहे. याठिकाणी १०० एचपी चा ट्रान्स्फार्मर कार्यरत आहे. मात्र त्या ऐवजी याठिकाणी ६३ एचपी चा ट्रान्स्फार्मर दिल्याने, तो जळून नादुरुस्त होत आहे.

दरम्यान या ठिकाणी अतिरिक्त एचपी चा ट्रान्स्फार्मर बसविणे गरजेचे आहे. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वीज वितरण विभागाकडून संबंधित डीपी साठी मंजुरी मिळाली असून, निधी मात्र मिळालेला नाही. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून तत्काळ निधी मिळाला, तर या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. अन्यथा वाळत चाललेली पिके पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही.

याकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधी लक्ष देणार आहेत का ? , कि केवळ राजकारण करण्यातच त्यांना धन्यता वाटते, असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी वर्गाला पडला आहे.