यात्रा बांबवडे च्या पांढरी ची….: बांबवडे श्री महादेव यात्रा
बांबवडे : बांबवडे इथं महादेवाची यात्रा २ ते ४ एप्रिल पर्यंत संपन्न होत आहे. श्री महादेव हे बांबवडे गावाचे ग्रामदैवत . इथला महादेव हे जागृत देवस्थान आहे. अशी इथल्या ग्रामस्थांची नितांत श्रद्धा आहे. म्हणूनच हि यात्रा इथल्या पांढरीची यात्रा समजली जाते.

पहिल्या दिवशी कावड यात्रा काढली जाते. या कावड यात्रेत, पाटील, वाळके, चौगुले, निकम, कुंभार, तेली, अशा कुटुंबांची कावड, मानाची कावड मानली जाते. सरूड रोड येथील दाट आंबा इथं शिखर शिंगणापूर च्या महादेव देवाचे पूजन केले जाते. उपस्थित मंडळींना आंबील, घुगऱ्यांचा प्रसाद ,वाटला जातो. याचदिवशी घरोघरी पुरणपोळी, आंबील घुगऱ्यां चा नैवेद्य अर्पण केला जातो. संध्याकाळी ऑर्केस्ट्रा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दुसऱ्या दिवशी मात्र मटण भाकरी किंवा चपाती आणि तांबड्या, पांढऱ्या रश्श्याचा बेत असतो. परंतु यावेळी दुसरा दिवस सोमवार असल्या कारणाने या दिवशी हा बेत न आखता, मंगळवारी करण्यात आला आहे. सोमवार ची गावात हत्या केली जात नाही. म्हणून यात्रेचा हा दिवस टाळून तिसऱ्या दिवशी हा बेत आखला गेलाय.

या नंतर दुपारी तीन वाजता कुस्तीचा आखाडा निर्माण केला आहे. इथं गावोगावचे मल्ल येवून, आपले कुस्तीचे डाव आणि ताकद आजमावताना आपल्याला दिसणार आहेत. त्यामुळे कुस्ती शौकीन आवर्जून जमा होणार, यात शंका नाही. कारण ग्रामीण भागातून आलेले मल्ल च भविष्यात जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर चमकतात. प्रत्येक नामवंत मल्लाचं यात्रा हे पहिले पाउल असतं.

या कुस्तीच्या आखाड्यात नामवंत मल्लांची उपस्थिती असणार आहे. यामध्ये अमोल बुचडे कुस्ती संकुल पुणे चे पैलवान समीर देसाई कोल्हापूर विरुद्ध काका पवार पुणे चे पै. कौतुक डाफळे असा सामना होणार आहे, तर शाहुवाडी केसरी पै. अजित पाटील सावे विरुद्ध आदर्श कुस्ती केंद्र वैभव दादांचा पट्टा यांचे पै.अभिजित मोरे सांगली असा सामना रंगणार आहे. शित्तूर वारुण शाहुवाडी केसरी पै. अभिजित भोसले विरुद्ध शाहूपुरी तालीम केसरी पै. राघू शिंदे असा सामना रंगणार आहे. शित्तूर वारुण शाहुवाडी केसरी पै. कुमार पाटील विरुद्ध गंगावेश कोल्हापूर चे पै. सतपाल नागटिळक. शित्तूर वारुण शाहुवाडी केसरी पै. सुरज पाटील विरुद्ध गंगावेश कोल्हापूर चे पै. अजय कवडे असे प्रमुख सामने रंगणार आहेत. याशिवाय अन्य कुस्त्या देखील रंगणार असून कुस्ती शौकिनांना हि नामी संधी प्राप्त झाली आहे.

अशी माहिती लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले यांनी यात्रा समिती च्यावतीने दिली आहे.

दरम्यान श्री महादेव यात्रा कमिटी चे मान्यवर सरपंच भगतसिंग तानाजीराव चौगुले, उपसरपंच स्वप्नील घोडे – पाटील, अध्यक्ष दिलीप सर्जेराव बंडगर, खजिनदार आनंदा बाबुराव प्रभावळे, सदस्य गजानन श्रीपती निकम, संजय शंकर पाटील, अमर संभाजी निकम, संतोष शामराव पाटील, उमेश बाबुराव चव्हाण, संदीप रंगराव बंडगर, शरद भिकाजी निकम, शरद शंकर चौगुले, दत्तात्रय परसू कांबळे, विजय जयवंत कांबळे,संजय सुंदर माने, राजेश अनंत कांबळे ( भाव्या ), महादेव विलास निकम, शामराव बाबुराव कांबळे आदी मान्यवर यात्रा समितीचे नियोजन करीत आहेत.