शाहुवाडी पोलिसांची मटका व अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात शाहुवाडी व आंबा या दोन ठिकाणी शाहुवाडी पोलिसांनी कारवाई करून ” मटका ” जुगार चालविणाऱ्यांवर धडक कारवाई केली असून , या दोघांना महाराष्ट्र जुगार कायदा कलम अंतर्गत अटक केली आहे. त्याचबरोबर त्यांच्यापैकी एकाला देशी दारू अवैध रीत्त्या विक्रीसाठी जवळ बाळगल्यामुळे त्याच्यावर देखील दारूबंदी कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शाहुवाडी पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाई बद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री प्रकाश गायकवाड तसेच त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे देखील अभिनंदन.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली सविस्तर हकीकत अशी कि, दि. ३१ मार्च रोजी सायंकाळच्या दरम्यान शाहुवाडी तालुका शाहुवाडी येथील शाहुवाडी पिकअप शेड समोर असलेल्या बंद सर्विसिंग सेंटर जवळ उघड्यावर राजेश अशोक मिरजे वय ३८ वर्षे ( रहाणार शाहुवाडी ) याला कल्याण मटका चालवीत असताना शाहुवाडी पोलिसांनी अटक केली . यावेळी त्याच्याजवळ १५७०/- रुपये रोख रक्कम व कल्याण मटका च्या चिठ्ठ्या त्याच्याजवळ सापडल्या. त्याच्यावर शाहुवाडी पोलिसांनी कारवाई करून महाराष्ट्र जुगार कायदा कलम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार सावंत करीत आहेत.

दरम्यान याचदिवशी आंबा इथं सुद्धा धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये विष्णू शंकर पाटील वय ४३ वर्षे रहाणार आंबा यास आंबा – विशाळगड रोड वर आंबा गावाच्या हद्दीत एका घराच्या आडोशाला जी.एम. कंपनीची देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगली होती. त्याच्याजवळ १४४५५/- रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. त्याचबरोबर हा कल्याण मटका सुद्धा घेत असल्याचे त्याच्या जवळ असलेल्या चिठ्ठ्या व रोख रक्कम १३००/-रुपये निदर्शनास आले. यावेळी त्याच्याकडून एकूण १५७६०/- रुपये (मुद्देमालासह )रुपये आढळून आले. यामुळे त्याच्यावर कारवाई करून त्यास अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड अंमलदार बाजीराव सिंघन करीत आहेत.

दरम्यान शाहुवाडी तालुक्यात पोलीसांनी केलेल्या या धडक कारवाई मुळे प्रशासन जागे आहे, याची जाणीव तालुकावासीयांना झाली असल्याची चर्चा नागरीकातून होत आहे. हि कारवाई शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.