सामाजिक

” महादेवाच्या नावानं चांग भलं ” : बांबवडे च्या ग्रामदैवताची यात्रा


” महादेवाच्या नवानं चांग भलं ” च्या जयघोषात कावड यात्रा संपन्न झाली.


लहानांपासून थोरांपर्यंत महिलांपासून वरिष्ठांपर्यंत प्रत्येकजण या कावड यात्रेत सहभागी झाले होते. बेंजो वर धार्मिक गाणी, तर धनगरी ढोलाच्या नादावर बांबवडे नगरी डोलत होती. यामध्ये कोणतेही राजकारण न होता, केवळ धार्मिक भावना जपत अनेक मंडळी या यात्रेत सहभागी झाली होती.
सरूड रोड येथील दाट आंबा नावाच्या परिसरात घोंगड्या च्या आसनावर देव पूजन करण्यात आले. शिखर शिंगणापूर च्या महादेवाची हि पूजा सर्व ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत समाधानात संपन्न झाली. यावेळी आरती करून देवाला मनोभावे स्मरण्यात आले.


यावेळी पाटील, चौगुले, वाळके, निकम, तेली, कुंभार अशा कुटुंबांची मानाची कावड काढण्यात आली. प्रत्येकाच्या घरापासून सरूड रोड पर्यंत अनवाणी कावड घेवून जाण्याची प्रथा आहे. या कावड मध्ये एका घागरीत आंबील तर दुसरी घागर पाण्याने भरलेली असते. त्यानंतर देवाची पूजा करण्यात आली. आरती देखील यावेळी संपन्न झाली.


यावेळी लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले यांनी स्वत: खांद्यावर कावड घेवून धार्मिकता जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला.


त्यानंतर सर्वांना आंबील आणि घुगऱ्यांचा प्रसाद वाटण्यात आला. प्रसाद वाटप झाल्यानंतर कावड यात्रा माघारी फिरली. माघारी फिरताना प्रत्येक कुटुंबाच्या दारात पाणी सोडून कावड धारकरी यांच्या पायावर पाणी सोडून गारवा देण्यात आला.


दरम्यान यानंतर देवळात पुरण पोळी चा नैवेद्य ग्रामस्थांनी दाखवला.
सायंकाळी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!