सर्व सामन्यांच्या हृदयातील “अनभिषिक्त सम्राट ” म्हणजे गौतम सर : त्यांना भावपूर्ण आदरांजली
बांबवडे : दिन-दलित जनतेचे पाठीराखा समजले जाणारे, सर्व सामान्य जनतेच्या हृदयातील, अनभिषिक्त सम्राट गौतम कांबळे सर यांना त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने भावपूर्ण आदरांजली.

भारतीय दलित महासंघाचे संस्थापक स्व. गौतम कांबळे सर म्हणजे खऱ्या अर्थाने सर्व सामान्य जनतेचा एक बुलंद आवाज होते. स्व. आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेलं हे व्यक्तिमत्व नेहमीच रस्त्यावरच्या लढाई साठी सदैव तयार असायचे. गौतम सर फक्त दलित समाजासाठी नव्हे, तर बहुजन समाजासाठी सुद्धा एक बुलंद तोफ होती.

त्यांच्या आवाजात जरब, आणि गोर गरीब जनतेसाठी आत्मीयता नेहमीच पहायला मिळाली. भारतीय दलित महासंघ निर्मितीच्या अगोदर ते मच्छींद्र सकटे यांच्या दलित महासंघ या संघटनेत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी भारतीय दलित महासंघ ची निर्मिती केली. या अगोदर त्यांनी महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यातून कार्यकर्ता गोळा केला. प्रत्येकजण कोणत्या – न कोणत्या अत्याचाराने पिचला होता. अशा सर्वांना त्यांनी एकत्र केले. आणि प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यावर गाढ विश्वास ठेवून होता.

परंतु गौतम सरांची सामाजिक स्तरावरची अचानक झालेली एक्झिट कोणालाही न रुचणारी, आणि न परवडणारी होती. गौतम सर म्हणजे प्रत्येक अन्यायावरचे जालीम औषध होते. त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून अनेक अधिकाऱ्यांवर सकारात्मक वचक बसवला होता.

अशा व्यक्तिमत्वाची अचानक झालेली एक्झिट त्यांच्या कुटुंबाला सुद्धा न परवडणारी होती. गौतम सर म्हणजे एक असा पांथस्थ ज्याने स्वत:पेक्षा सामान्य जनतेला अधिक किंमत दिली. स्वत:च्या वक्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना आपलंस केलं होतं.

अशा व्यक्तिमत्वाच्या अकाली जाण्याने अनेकांचे धीर तुटले. अनेक मंडळी पोरकी झाली. अनेकांनी हंबरडा फोडला. परंतु या वाघाने घेतलेली एक्झिट सुद्धा त्यांच्या म्हणजेच वाघाच्या झेपेसारखी होती. क्षणभर कोणाला ते पटलंच नाही.परंतु वाघ एकदा गेला तो गेलाच. आज त्यांचा प्रथम स्मृतिदिन. या दिवशी त्यांची आठवण आली नाही, तरंच नवंल. अशा प्रकृती, संस्कृती आणि विकृती यांचं भान ठेवणाऱ्या या आमच्या जिवलग मित्राला पुन्हा एकदा साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली.