जीवनातील यशासाठी कठोर परिश्रमाची गरज – डॉ. प्रभाकर पवार
सरूड प्रतिनिधी :
आजच्या तरुण पिढीने आपला दैदीप्यमान इतिहास समजून घेत येणाऱ्या काळात आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देवून, जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. असे प्रतिपादन डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.

सरूड तालुका शाहुवाडी येथील श्री शिव शाहू महाविद्यालयाच्या ३९ व्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.टी.दिंडे यांनी केले.अहवाल वाचन प्रा.डी.बी. श्रीराम यांनी, तर पाहुण्यांची ओळख प्रा.डी.आर.नांगरे यांनी केली.


यावेळी पुढे बोलताना डॉ. प्रभाकर पवार म्हणाले, इतिहासाचा वेध घेत भविष्याची आखणी करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. सामाजिक भान जपत आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उजव्वल यश संपादन केले पाहिजे.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे संचालक युवराज पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत खूप अभ्यास करून यशाला गवसनी घालावी. आपल्या मार्गदर्शक शिक्षकांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा.

यावेळी बोलताना संस्थाअध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, शिक्षण हे अतिशय महत्त्वाचे आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर गुरूंचे मार्गदर्शन महत्त्वाचे असून गुरूंचे विचार आत्मसात करावे. युवकांनी आपली जबाबदारी ओळखून, कौशल्य आत्मसात करून यश संपादन करावे. यावेळी महाविद्यालयातील विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संचालक रामचंद्र पवार, नागवेकर, सुनिल पाटील, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एल.के.बोराटे व प्रा. सुलोचना मोहिते यांनी केले.तर आभार प्रा.डॉ. पी.बी.पाटील यांनी मानले.

** २०२१-२२ व २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी संस्थेकडून देण्यात येणारा गुणवंत कर्मचारी शिक्षक पुरस्कार हा
डॉ. पी.बी. पाटील व डॉ.एस.एस. बनसोडे यांना तर गुणवंत प्रशासकीय कर्मचारी हा पुरस्कार एस.डी. कांबळे व अकाराम कदम यांना प्रदान करण्यात आला.

**डॉ.प्रभाकर पवार यांच्या हस्ते संस्थाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर यांना महाविद्यालयाच्या वतीने गौरवपत्र प्रदान करण्यात आले.