शिवाजी महाराज यांच्या विटंबनेच्या निषेधार्थ बांबवडे कडकडीत बंद
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं शिवाजी महाराज यांच्या विटंबनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला.

हेरले तालुका हातकणंगले इथं शिवजयंती निमित्त लावलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे डिजिटल बॅनर काही समाजकंटकांनी लाईट घालवून फाडला. या घटनेच्या निषेधार्थ शाहुवाडी तालुक्यात बांबवडे, मलकापूर, सरूड, येळाणे याठिकाणी बंद पाळण्यात आला.

बांबवडे इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शिवप्रेमी बांधवांनी निषेध करीत घोषणा दिल्या.

यावेळी काहींनी आपली मनोगते व्यक्त केलीत. त्यानंतर पिशवी रोड मार्गे मारुती मंदिर येथून पुन्हा शिवाजी महाराज चौक अशी निषेध फेरी पूर्ण झाली. त्यानंतर विजय मंत्राचे पठन करण्यात आले.

यानंतर निषेध पूर्ण झाला. बंद हा संपूर्ण दिवस असणार आहे.

यावेळी सर्व व्यापारी, भाजी विक्रेते, दुकानदार मंडळींनी दुकाने बंद ठेवून सहकार्य केल्याबद्दल शिवप्रेमींनी आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमास बांबवडे गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व शिवप्रेमी बांधवांनी उपस्थिती दर्शविली होती.

पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक श्री कोळपे, महिला पोलीस उपनिरीक्षक, गोपनीय विभागाचे बाबासाहेब किटे उपस्थित होते.