वहातुक कोंडी फोडण्याची जबादारी सर्वानीच स्वीकारावी -तहसीलदार रामलिंग चव्हाण
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं नेहमीच होणाऱ्या वहातुक कोंडी संदर्भात, बांबवडे ग्रामपंचायत सभागृह इथं बैठक संपन्न झाली.


बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रामलिंग चव्हाण होते. तसेच गावातील व्यापारी वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना तहसीलदार चव्हाण म्हणाले कि, वहातुक कोंडी हा सार्वजनिक प्रश्न असून, सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे. यासाठी दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे पार्किंग फलक बनवून महसूल आणि पोलीस खात्याने एकत्रित काम करून लावावेत. सध्या बांबवडे ग्रामपंचायत चे सरपंच भगतसिंग चौगुले व त्यांचे सदस्य मंडळ यांनी पार्किंग साठी पांढरे पट्टे मारून अभिनंदनास्पद काम केले आहे.

वडाप, रिक्षा, आणि ट्रॅव्हल्स उभी करण्यासाठी स्वतंत्र जागेचे नियोजन करण्यात आले असून, या मंडळींनी नेमून दिलेल्या जागेतच वाहने उभी करावीत.

तसेच चार चाकी वाहनांच्या पार्किंग साठी बाजारपेठ, जनावरांचा दवाखाना, या व्यतिरिक्त मलकापूर दिशेला असलेल्या गायरानात सुद्धा पार्किंग साठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान सरपंच भगतसिंग चौगुले यांनी बांबवडे दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी असत नाहीत, असे सांगताच पोलीस निरीक्षक श्री प्रकाश गायकवाड संतप्त झाले, आणि त्यांनी खात्याकडे अल्प कर्मचारी आहेत, तेंव्हा अशी मागणी योग्य नाही, आशा आशयाचे प्रत्युत्तर दिले. शाहुवाडी पोलीस ठाण्याकडे अल्प कर्मचारी वर्ग आहे, हे जरी मान्य असले, तरी त्यांनी वाहतुकीची जाबाबदारी स्वराज्यसंस्थांवर ढकलणे, हि गोष्ट योग्य नसून, ती जबाबदारी पोलीस कर्मचाऱ्यांचीच आहे. कारण रस्त्यावरील वहातुक स्वराज्य संस्थांचे ऐकणार नाहीत. त्यांना पोलीस कर्मचारी च आवश्यक आहेत. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

याबाबत तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनीदेखील पोलीस विभागाला सांगितले कि, प्रत्येक खात्याने आपली जबाबदारी सांभाळली पाहिजे. एकमेकांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही.अशा आशयात ” घरचा आहेर ” दिला.

यावेळी गटविकास अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी नसीम मुलाणी, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळ, तरुण मंडळांचे अध्यक्ष, गावातील पदाधिकारी, व मान्यवर ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते.