बांबवडे येथे पुरोगामी संघटना कडून केंद्र सरकारचा निषेध
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध पुरोगामी, परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीगीरांचे बृजभूषण सिंग यांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात केंद्रसरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत कारवाईची मागणी बांबवडे येथे निदर्शनाद्वारे करण्यात आली.

बांबवडे, ता.शाहूवाडी येथे पोलीस स्टेशनच्या समोर या सर्व पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच साक्षी मलिक व विनेश फोगट यांना न्याय मिळालाच पाहिजे, बृजभूषण सिंग वर कठोर कारवाई करा, अशा घोषणा देण्यात आल्या.

आंदोलनकर्त्यांचे निवेदन पीएसआय प्रसाद कोळपे यांनी स्वीकारले. या निवेदनात म्हटले आहे की ,खूप परिश्रम करून आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकांची लयलूट करणाऱ्या या महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण बृजभूषणसिंग सारखा एक खासदार करतो आणि या महिला खेळाडूंची तक्रारीची दखल केंद्र सरकार घेत नाही. उलट ब्रुजभूषण सिंगला वाचवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या सुरू आहे .याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. लवकरात लवकर बृजभूषण सिंग वर कारवाई करून महिला खेळाडूंना न्याय मिळावा.अशी मागणी या निदर्शनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील, प्रा.प्रकाश नाईक, चंद्रकांत रेडेकर, डॉ.प्रभाकर कांबळे, राजाभाऊ मगदूम , सुरेश म्हाऊटकर, मुकुंद पाटील, पांडूरंग वग्रे, मुग्धा कांबळे ,अलका भालेकर, प्रा. निलेश घोलप , प्रदीप चरणकर , संदीप कांबळे , सचिन कांबळे, संदीप कांबळे गोगवेकर यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.