शाहुवाडी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण – भारतीय दलित महासंघ
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तहसील कार्यालय शाहुवाडी च्या समोर भारतीय दलित महासंघाच्या वतीने नांदेड येथील भिमसैनिकाची हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण दि. ७ जून २०२३ रोजी करण्यात आले. तशा आशयाचे निवेदन प्रदेशाध्याक्ष श्रीकांत कांबळे व कार्यकर्ते यांनी शाहुवाडी चे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना दिले.

याबाबत अधिक माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील बोंडर हवेली या गावामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गावामध्ये जयंती साजरी केल्याबद्दल जातीय द्वेषापायी अक्षय भालेराव या भिमसैनिकाची हत्त्या करून, त्यांच्या कुटुंबाला अमानुषपणे मारहाण करण्याच्या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला.

सदर ची घटना अतिशय निंदनीय असून, मानवतेला काळिमा फासणारी आहे. नांदेड जिल्ह्यातील दलित समाजावर होणारा अन्याय आणि अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याबाबत पोलीस प्रशासन असंवेदनशील असल्याचे स्पष्ट होत आहे. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिणामी दलित समाज दहशतीखाली जगत आहे, असेही या निवेदनात नमूद केले आहे.

संबंधित अन्याय आणि अत्याचाराला प्रतिबंधित करण्यासाठी प्रभावशाली उपाययोजना करण्यात याव्यात, या मागणी साठी शाहुवाडी तहसील कार्यालयासमोर हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

यावेळी दयानंद कांबळे, आकाश कांबळे, संतोष कट्टे, प्रदीप माने, सागर गायकवाड, किरण कांबळे, रोहित एटम, नाना लोखंडे, गणेश कांबळे या कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.