शांतता रहावी आणि कायदा पाळावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – पो. नि .प्रकाश गायकवाड
मलकापूर प्रतिनिधी :
शाहुवाडी तालुक्यात शांतता आणि संयम कायम रहावा, यासाठी सर्व धर्मीयांचे प्रशासनाला सहकार्य असावे, व असणारा सलोखा कायम रहावा, असे आवाहन शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले. सर्वांचे पोलीस प्रशासनाला सहकार्य राहील, अशी ग्वाही शांतता समितीच्या बैठकीच्या वतीने देण्यात आली.

कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाहुवाडी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी शांतता समिती बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन पांढरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील, शाहुवाडी-पन्हाळा भाजपचे विधानसभा संपर्कप्रमुख प्रवीण प्रभावळकर, मुस्लिम जमियत संघटनेचे अध्यक्ष सिकंदर जमादार, गुलाब भटारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड म्हणाले कि, एखाद्या अनुचित घटनेने निरपराध नागरिकांना त्रास होत आहे. प्रसंगी पोलीस प्रशासनाला अशा वेळी कारवाई करावी लागत आहे. विनाकारण जनजीवन विस्कळीत होत आहे. कायदा हातात घेऊ नये. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर कोणती ही पोस्ट व्हायरल झाली, तरी त्याची खातरजमा करावी, आणि कोणत्याही प्रकारे अफवा पसरवून जनजीवन विस्कळीत होईल, असे कृत्य करू नये. अन्यथा पोलीस प्रशासनाला कारवाई करावी लागेल.

शाहूवाडी तालुक्याची असणारी शांतता आणि सलोखा कायम राहावा. पोलीस प्रशासनाला आपणा सर्वांचे सहकार्य रहावे. पोलीस प्रशासन सदैव तुमच्या सोबत आहे, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

शांतता समितीच्या बैठकीत देखील पोलीस प्रशासनाला सर्व सहकार्य राहील. तालुक्यात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही. सर्व धर्मीय बांधव सलोख्यांने आणि शांततेने रहात आहेत, अशी ग्वाही देण्यात आली. तर मुस्लिम जमीयत संघटनेच्या वतीने यावेळी सांगण्यात आलं की, समाज अशा कोणत्याही घटनेला पाठीशी घालणार नाही.

प्रारंभी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस चिले यांनी उपस्थितांचे स्वागत करून शांतता समिती बैठकीचे आयोजन व असणारी भूमिका यावेळी विशद केली.

या बैठकीस गणि ताम्हणकर, माजी नगरसेवक शौकत कळेकर, अमर पाटील, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर, महेश विभूते, प्रकाश कांबळे, दस्तगीर अत्तार, इम्रान तरटे, मंगेश विभुते, संतोष कुंभार आदींच्यासह नागरिक शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.