सरूड मध्ये कोंबड्या चोरट्यांची चंगळ : सुमारे २५ हजारांचे नुकसान
बांबवडे : सरूड तालुका शाहुवाडी येथील शेतकरी भुरट्या चोरट्यांमुळे हैराण झाला असून, पोलीस प्रशासनाने याकडे जातीने लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सोमवार दि.१२ जून २०२३ रोजी वृत्तपत्र विक्रेते सुभाष कुऱ्हाडे, बळवंत कुऱ्हाडे या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या वस्तीवरील ८० हून अधिक गावठी कोंबड्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेवून, पोबारा केला आहे. या चोऱ्या बंदिस्त पिंजऱ्यासह कोंबड्या, अंडी, आणि पिल्ल्यांसाहित घेवून गेल्यामुळे चोरट्यांची मजल किती वाढली आहे. हे या प्रकारावरून दिसून येते. दरम्यान हा माल सुमारे २५ हजार रुपये किमतीचा होता.

मागील सहा महिन्यांपूर्वी देखील असा प्रकार घडत होता. त्यानंतर हा प्रकार थांबला.आणि आत्ता कुऱ्हाडे बंधूंच्या वस्तीवरील कोंबड्यांचा पिंजराच चोरट्यांनी लंपास केला आहे.

दरम्यान सरूड येथील बिरोबा चा माळ या शेतवस्तीवर हा प्रकार घडत आहे. बहुंशी शेतकरी संध्याकाळी आपली शेतातील कामे झाल्यानंतर गावात घराकडे येतात. आणि पहाटे पुन्हा आपल्या रानाकडे जातात. दरम्यान च्या काळात शेतकरीवस्तीवर नसल्याचे पाहून, सदर चे प्रकार घडत आहेत. दरम्यान कोंबड्या चोरीला गेल्या अशी तक्रार करायची कशी ? या न्युनगंडापायी शेतकरी पोलिसात तक्रार दाखल करायला कचरत असल्याने, सदरच्या घटना घडत आहेत.

पोलीस प्रशासनाने सदर च्या घटनांकडे जातीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जात आहे.