उपसाबंदी आदेश अन्यायकारी : पिके होरपळू लागलीत
आंबा प्रतिनिधी : कृषी पंपासाठी होणारा विजेचा लपंडाव, यामुळे नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो हेक्टर ऊस क्षेत्रावरील ऊस पीक वाळत आहे.

लांबलेला पाऊस, कृषी पंपासाठी वरचेवर होणारा खंडित वीज पुरवठा, यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याचे फेर पूर्ण होत नाहीत. तसेच लोड शेडिंगच्या नावाखाली कृषीपंपाचा वीजपुरवठा केव्हाही, कितीही वेळ खंडित केला जातो. हा खंडित वीजपुरवठा वाढवून मिळत नाही. त्यामुळे केवळ चार तासच वीज मिळते. अशातच उपसाबंदीच्या आदेशाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

तालुक्यातील कडवी नदी कोरडी पडल्याने प्रामुख्याने ऊस पीक धोक्यात आहे. त्याचबरोबर जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा होण्याच्या गावांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. परिसरात वळीव पावसाने बऱ्याच वेळा हुलकावणी दिल्याने व अपुरा पाणीपुरवठा यामुळे पिके होरपळत आहेत. पाणी देऊन पिकांची केलेली पेरणीही अडचणीत आहे. ऊस पिकाबरोबरच सोयाबीन, भात पीकही धोक्यात आहे.