जनसेवेच्या व्रताचं २५ वर्षांनी सोनं झालं : आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार
बांबवडे : पत्रकारिता हे जनसेवेचे व्रत मानून २५ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या कारकिर्दीचं आज खऱ्या अर्थाने चीज झालं . आज कोल्हापूर जिल्हा परिषद च्या वतीने देण्यात येणारा आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता हा पुरस्कार स्विकारताना मन भरून आलं. शब्द नि:शब्द झाले, आणि डोळ्यांच्या कडांचे बांध फुटले.

सर्वप्रथम या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा देणारे आमचे गुरु श्री वसंतराव सिंघण बापू , यांचे मनापासून आभार आणि त्यांना अभिवादन. कारण जनसेवेचे व्रत पेलण्यासाठी, या व्यक्तिमत्वाने नेहमीच माझ्या पाठीशी उभे रहाणे, पसंत केले. ज्यावेळी मन खचेल, त्यावेळी त्याला उभारी देण्याचे महत्वपूर्ण काम या व्यक्तिमत्वाने केले, म्हणूनच आज या पुरस्काराला तयार होण्याच्या योग्यतेचा झालो, यासाठी त्यांचे शतश: आभार.

या पुरस्कार सोहळ्याच्या अनुषंगाने गेल्या २५ वर्षात भोगलेल्या जखमा, आज पुन्हा एकदा हळव्या झाल्या. कारण पत्रकारिता हा केवळ पेशा नसून, ते एक काटेरी बस्तान आहे. या काटेरी बस्तानावर आपण आपल्या मर्जीने बसतो, परंतु त्याच्या वेदना मात्र अवघ्या कुटुंबाला सहन कराव्या लागतात. माझ्या कुटुंबाने, त्या कोणतीही कुरबुर न करता, सोसल्या, आणि चेहऱ्यावर त्याची एक रेष सुद्धा उमटू दिलेली नाही. यात माझी पत्नी सौ मंजिरी आणि माझी दोन्ही मुलं माझ्या या व्रताच्या यशस्वीतेसाठी माझ्याबरोबर राबलेली, मी विसरू शकत नाही.
जोतिबावर शाहुवाडी टाईम्स चा अंक विकणारा अवघा नऊ वर्षाचा मुलगा ओंकार हाताला न पेलवणारं अंकाचं ओझं घेवून, केवळ दोन रुपयाने अंक विकण्यासाठी झटत होता. सहा वर्षांची माझी मुलगी आपल्या भैया चा हात धरून त्याच्यासोबत उभी होती. हे चित्र मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही.

अंक चालवण्यासाठी घेतलेलं कर्ज परतफेड करताना आम्ही दोघेही जीवाचं रान करीत होतो. अशा बऱ्याचशा आठवणी आजही डोळ्यांच्या कडा ओल्या करून जातात. तरीसुद्धा न डगमगता चालवलेला अंक आज हयातभर केलेल्या कष्टाचं कितीतरी पटीने उतराई करून गेलेल्याचं समाधान आज लाभलं. माझ्या सोबत त्याकाळात राबलेले माझे सहकारी, प्रकाश पाटील, भाई पवार, विजय डवंग, माजी सभापती स्व. रामभाऊ लांबोरे, जयवंतराव काटकर, नामदेवराव खोत, बाळासाहेब गद्रे, हंबीरराव पाटील बापू, गोकुळ चे संचालक स्व. आनंदराव पाटील भेडसगावकर तात्या, स्व. प्रभाकर प्रभावळकर मामा, शिवाजीराव कोल्हापुरे, सुभाषराव कोकाटे, आनंदराव भेडसे, छत्रपती पुरस्कार विजेते वस्ताद वसंतराव पाटील, प्रा. बापूसाहेब कांबळे, सुरेश नारकर बापू, विशाल काळे, बाबुराव सागावकर , राजेश यादव, सावेचे संभाजी पाटील, यशवंत मगदूम, उचत चे आनंदराव कांबळे, बाबुराव नलवडे,पत्रकार सुभाषराव बोरगे, नथुराम डवरी, संजय रोडे पाटील, उदय कोकणे, दिग्विजय कुंभार, आनंदराव केसरे, राजेंद्र लाड, डी आर. पाटील, शिवशाहू महाविद्यालय सरूड, प्रा. एन.डी. पाटील महाविद्यालय पेरीड, चे प्राध्यापक वृंद असे अनेक सहकारी माझ्या सोबत मला सहकार्य करायला झटत होते. यांना विसरून चालणार नाही. या सगळ्यांचे मनापासून आभार.
असो. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवाला देवपण येत नाही. आज प्रशासनाने आम्हा पतीपत्नीना गौरविले, या बद्दल मुकुंद पवार आणि कुटुंबीय प्रशासनाच्या ऋणात राहू इच्छितो.