…अन्यथा शिराळा पंचायत समिती कार्यालयास टाळे ठोकणार : भारतीय दलित महासंघ
शिराळा / प्रतिनिधी :
भारतीय दलित महासंघाच्या शिराळा शाखेमार्फत गटविकास अधिकारी,पंचायत समिती शिराळा यांना आज शिराळा तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये शासन आदेशानुसार दलित वस्तीमध्ये ३१ मार्च अखेर १५% रक्कम खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई होणेबाबत निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णय क्र . ग्रापपु-१०८९ / ५४ / प्र . क्र .१०५२ / २१ अ नुसार ग्रामपंचायतीनी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या १५ % रक्कम प्रतिवर्षी मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी व विकासासाठी ३१ मार्च अखेर खर्च करणे आवश्यक आहे . परंतु शिराळा तालुक्यात ग्रामसेवक व सरपंचाकडून १५ % रक्कम दलित वस्तीच्या विकासासाठी खर्च होत नसल्याचे निदर्शनास येत आहे . सदरचा निधी हा दलित वस्ती व्यतिरिक्त इतरत्र खर्च केला जात आहे . शिवाय १५ % निधी बाबत दलित समाजाची दिशाभुल केली जाते .सरपंच व ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे व राजकीय दबावामुळे १५ % निधीचा विनियोग दलित वस्तीच्या विकासासाठी होत नाही .

शासनाने शिराळा तालुक्यात दलित वस्तीच्या विकासासाठी गावच्या महसुलातील १५ % रक्कम ३१ मार्च पर्यंत खर्च न करणाऱ्या व शासन आदेश न अंमलात आणणाऱ्या ग्रामपंचायतीवर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १४५ ( १ ) अनुसार कारवाई करावी . शिवाय शासन आदेशाचे पालन न करणाऱ्या व दलित समाजाची फसवणुक करणाऱ्या ग्रामसेवकावर भारतीय दंडविधान व अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करणेत यावी . सदरच्या निवेदनाची संवेदनशीलरीत्या गांभीर्याने दखल न घेतलेस १५ % निधीच्या गैरकारभारास गटविकास अधिकाऱ्यांना जबाबदार धरून शिराळा पंचायत समिती समोर तीव्र आंदोलन छेडून शिराळा पंचायत समिती कार्यालयास टाळे ठोकले जातील याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी विनंती भारतीय दलित महासंघाचे शिराळा तालुका अध्यक्ष दयानंद शिवजातक यांनी केली आहे.

या निवेदनावर दिलिप मोरे, विनोद आढाव, अमोल बडेकर, धनाजी तुपारे, शशिकांत कांबळे, विनोद कांबळे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.