बैलप्रेमी उत्तम निकम यांनी केलेली सेवा आजही स्मरणात
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर ):जनावर म्हटलं की त्याचा उपयोग आहे, तोपर्यंतच वापर करून नंतर दुर्लक्षित करणारे अनेक पहावयास मिळतात. परंतु शिराळा येथील बैलप्रेमी उत्तम निकम यांनी आपल्या ” सोन्या ” नामक बैलाची केलेली सेवा आजही बैलप्रेमींच्या स्मरणात कायम आहे. तर सोन्या नावाच्या बैलाची दहशत बैलगाडा मैदानावर वर्षानुवर्षांपासून कायम आहे. ” एका वळू खोंडाने बदललं आयुष्याचं रुपडं “.


कोणाचं नशिब कुठं चमकेल हे कोणीही सांगू शकत नाही. शाळा कॉलेज करत असतानाच शिराळा येथील उत्तम निकम यांना लहानपणापासूनच शेती व बैलजोड्या पाळण्याचा छंद होता. यातच १९९४ साली कुरळप (ता.वाळवा) येथील प्रतिष्ठित नागरिक त्यांचा मावस भाऊ प्रकाश पाटील यांनी आमच्या गावात एक वळू खोंड मोकाट फिरत आहे. तू त्याला घेऊन जातोस का ? असे विचारले असता, उत्तम निकम हे ही लगेच तयार झाले. व दुसऱ्या दिवशीच कॉलेजमधील चार पाच सवंगडी घेऊन ते कुरळपला गेले. यावेळी तिथंला सर्वत्र मोकाट फिरणारा वळू खोंड गावकऱ्यांचा लाडका बनला होता. गावकरी त्याला प्रेमाने सोन्या म्हणून बोलवत असतं तो शेतकऱ्यांच्या शेतात घुसून पिकांवर यथेच्छ ताव मारत असंत, आता सोन्या मोठा होऊ लागल्याने अनेकांना त्याला कोणीतरी त्याचा चांगला सांभाळ करणारा भेटावा, असं वाटू लागलं होतं. याचं वेळी प्रकाश पाटील यांनी माझा भाऊ त्याला सांभाळण्यास तयार असल्याचे सांगितले. गावकरी ही तयार झाले. मात्र मोकाट फिरणारा व गावकऱ्यांच्या लाडात वाढलेला सोन्या काही केल्या लोकांच्या हाताला लागेना शेवटी चार पाच दिवसांनंतर सोन्याला पकडण्यात यश आले.

उत्तम निकम यांनी सोन्याला आपल्या घरी आणलं व त्याचा सांभाळ करु लागले. सगळया घरादाराचा सोन्या लाडका बनला. यावेळी शिराळा येथील नामवंत बैलगाडा शर्यतीचे चालक विलास निकम व तात्या भांडवले यांची नजर त्या खोंडावर पडली. त्यांनी सदर खोंडाला शर्यतीचे धडे देण्याचा सल्ला उत्तम निकम यांना दिला. तेही तयार झाले, आणि सोन्याचा सराव सुरू झाला. पुढे सोन्या लहान लहान मैदानात उतरत यश संपादन करु लागला. बैलगाडा चालक विलास निकम, तात्या भांडवले यांचं ही सोन्यावर अतिशय प्रेम जडलं होतं. आता सोन्याचा गवगवा पंचक्रोशीत होऊ लागला. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील नामवंत बैलगाडा मालक सोन्याला आपल्या बैलाबरोबर जोड लावण्यासाठी येऊ लागले. बघता बघता सोन्या तिनही जिल्ह्यात नामांकित बैल म्हणून प्रसिद्ध झाला. अनेकजण त्याला विकत घेण्यासाठी लाखों रुपयांची ऑफर उत्तम निकम यांना देऊ लागले. परंतु पोटच्या मुला प्रमाणे सा़ंभाळलेल्या सोन्याचा कधीच उत्तम निकम यांनी विकण्याचा विचार केला नाही. ते त्यांचं कुटुंब आणि सहकारी त्याचा मुला प्रमाणे सांभाळ करत होते. सोन्या मालक सोडून दुसऱ्या कोणालाही जवळ येऊ देत नव्हता. मैदानावर जाताचं डिरकाळ्या फोडून सर्व मैदानाचं लक्ष तो वेधून घेत असतं. उत्तम निकम यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. परंतु सोन्या दररोज मैदान मारुन बक्षिसांची खैरात करु लागला. मालकाची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारू लागली.

आणि १९९८साली एक दिवस त्याच्या डाव्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले. व डोळ्यावर मांस आल्याचं निदर्शनास आलं सोन्यावर औषध उपचार सुरू झाले. परंतु गुण काही येईना उत्तम निकम यांना कन्हेरी येथे लोकांच्या डोळ्यात वनऔषध घालत असल्याचे समजले. त्यांनी आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ केलेल्या सोन्याला कन्हेरीला नेले. परंतु औषध दोन दिवसांतूंन एकदा असं पंधरा दिवस घालावे लागते, असं सांगितलं. शिराळयातून येणं जाणं शक्य नसल्याने त्यांनी सहकाऱ्यांसह शेजारीच दहा बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाहुण्यांच्या घरी आश्रय घेतला. पंधरा दिवस दहा पंधरा किलोमीटर चालत जाऊन तिथं थांबून औषधोपचार करून परत घरी आले. परंतु सोन्याचा आजारं काही केल्या बरा होईना. उत्तम निकम यांनी त्यास मिरजेला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तिथं नेल्यावर डॉक्टरांनी त्याच्या डोळ्यावर आलेलं मांस काढून ऑपरेशन करून औषधोपचार केले. तरीही फरक पडत नव्हता. पुढे डॉक्टरांनी दुसरं ऑपरेशन करण्यास सांगितले. त्याचा डोळा काढण्यात आला. अनेकांनी सोन्याला इंजेक्शन देऊन मारण्याचा कसायला देण्याचा सल्ला दिला. परंतु त्यांनी स्पष्ट नकार दिला. आणि उत्तम निकम व त्यांचं कुटुंबिय त्याची सेवा करू लागले तब्बल वर्षांभर सेवा करत असताना २१/७/ १९९९ला एक दिवस सोन्या सर्वांना सोडून निघून गेला. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. अनेक बैलप्रेमींनी सोन्याचं अंतिम दर्शन घेतलं. सोन्यावर माणसाप्रमाणेच विधिवत अंतिम संस्कार करण्यात आले. आज उत्तम निकम शिराळा तालुक्यातील प्रतिष्ठित उद्योजक व शेतकरी आहेत. कारखान्याचे संचालक आहेत. जे काही मिळालं ती सोन्याची पुण्याई आहे असं सोन्याचा मालक उत्तम निकम हे आवर्जून सांगतात. त्यांच्या चार चाकी, दोन चाकीसह बंगल्यावर सोन्याचं नावं आजही अजरामर आहे.