अजितदादा व मुश्रीफ साहेब यांच्यासोबत जाण्याचा निर्णय – श्री मानसिंगराव गायकवाड दादा
बांबवडे : शाहुवाडी तालुक्याच्या विकासासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या भवितव्यासाठी जिल्ह्याचे नेते नामदार हसन मुश्रीफ साहेब, तसेच अजित पवार दादा यांच्यासोबत जाण्याच्या निर्णय कार्यकर्त्यांच्या चर्चेअंती आम्ही घेतला आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते मानसिंगराव गायकवाड दादा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हि पत्रकार परिषद बांबवडे तालुका शाहुवाडी येथील उदय साखर कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली.
यावेळी मानसिंग दादा पुढे म्हणाले कि, तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा आहे. करण आपली अनेक कामे कोल्हापूर जिल्हा बँकेशी संबंधित असतात. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीशी निगडीत असतात. तालुक्याच्या प्रगतीसाठी निधीची आवश्यकता असते. तो निधी सत्तेत असल्यानंतर च निर्विघ्नपणे आपल्याला मिळेल, आणि आपल्या भागाच्या विकासामध्ये भर पडेल.
यासाठी अजितदादा व मुश्रीफ साहेब यांच्यासोबात जाण्याचा आमचा निर्णय सर्वतोपरी विचार करून घेतला आहे. तसेच तालुक्यात माजी आमदार सत्यजित पाटील यांच्याशी असलेली आपली युती अबाधित राहील. तसेच विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांच्याबाबत आपला असलेला विरोध हा कायम राहील, असेही श्री मानसिंगराव गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते श्री महादेवराव पाटील साळशीकर माजी अर्थ व शिक्षण सभापती, संचालक पंडितराव शेळके, अजित पाटील शिंपे आदी मान्यवर या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.