शिराळा बायपास रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्वरित बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन – सुधाकर वायदंडे
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर):
शिराळा बायपास रोडवर सायंकाळी ट्रॅव्हल्स थांबल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अनेक अपघात होत आहेत. या वाहतूक कोंडीचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर वायदंडे यांनी केली आहे याबाबतचे निवेदन दलित महासंघाच्या वतीने शिराळा पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे.

सुधाकर वायदंडे म्हणाले कि, सायंकाळच्या दरम्यान मुंबईला जाणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स शिराळा येथील आयटीआय समोर बायपास रोडवर थांबलेले असतात. त्यामुळे तिथे लोकांची प्रचंड गर्दी होऊन, यात्रेचे स्वरूप आलेले असते. सांगली, इस्लामपूरहून शिराळा,कोकरूड, सांगाव, बांबवडे, मांगलेकडे येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्या अतिशय वेगात असतात, परंतु अचानक बाह्य वळन रोडवरील अंदाज न येता गर्दी समोर आल्याने अनेक चालकांचा गाडीवरचा ताबा सुटून, यापूर्वी अपघात झालेले आहेत. त्यात काही निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत.

वायदंडे म्हणाले, वारंवार मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतानाही त्याची प्रशासनाने दाखल घेणे गरजेचे असताना प्रत्यक्षात तसे दिसून येत नाही.

या रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणात असून ट्रॅव्हल्समुळे होणाऱ्या गर्दीचा बंदोबस्त केला नाही, तर अनेक अपघात होऊन निष्पाप लोकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. तरी सदर ट्रॅव्हल्समुळे बायपास रोडला जी वाहतुकीची कोंडी होत आहे ,त्याचा बंदोबस्त तत्काळ शिराळा पोलीस प्रशासनाने करावा, अन्यथा दलित महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.

यावेळी प. महा. कोषाध्यक्ष दिनकर नांगरे, दादासाहेब गायकवाड,ता. उपाध्यक्ष गंगाराम तांबीरे, संतोष शिंदे उपस्थित होते.